‘पुरुषोत्तम’च्या अंतिम फेरीसाठी कसून तयारी; तालमींची लगबग
पुणे : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरोवर पडदा पडला असून आता अंतिम फेरीची तयारी सुरू झाली आहे. यंदा करंडक पटकवायचाच, या ईयेने सर्वच संघांनी कंबर कसली आहे. प्राथमिक फेरीतील चुकांमध्ये सुधारणा, संहितेत आवश्यक असलेले काही बदल आणि कलाकाराच्या अभिनयावर मेहनत घेत हे संघ तालमींमध्ये घाम गाळत आहेत. चुरशीच्या स्पर्धेत बाजी मारत यंदा करंडक कोण पटकावणार, याची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे.
अंतिम फेरीसाठी नऊ महाविद्यालयाच्या संघांची निवड झाली. या सर्वच संघांच्या तालमींनी जोर पकडला आहे. “प्राथमिक फेरीच्या प्रयोगात काही चुका झाल्या होत्या. त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या दिवसातील १० ते ११ तास तालमीच्या ठिकाणी सगळे एकत्र असतात. अधिकाधिक वेळ तालमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे महाविद्यालय पाच वर्षांनी अंतिम फेरीत पोहोचले आहे, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत. यंदा करंडक आपल्याच महाविद्यालयात आणायचा, या निश्चयाने तयारी सुरू आहे”, असे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी चव्हाण हिने सांगितले.
‘प्रोसेसचा आनंद घेण्याचा प्रयत्न’
“अंतिम फेरीत निवड झाल्याचा आनंद तर आहेच. तालीम पूर्ण ताकदीने सुरू आहे. संपूर्ण संघ तालमीशिवायदेखील दिवसभर अधिकाधिक वेळ एकत्र घालवतो आहे. यातून संघात एकजूट निर्माण व्हायला मदत होत आहे, तसेच ‘प्रोसेस’चा आनंद लुटण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगले सादरीकरण करून करंडक मिळवण्याचे ध्येय आहेच. मात्र या तालमीच्या आठवणी नेहमीसाठी आमच्यासोबत राहतील. त्यामुळे या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रतिनिधी गौरी भानदुर्गे हिने सांगितले.
अंतिम फेरीच्या एकांकिकांचे वेळापत्रक...
शनिवार, २२ जानेवारी, सायंकाळी ५ ते ८
.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे- पाणीपुरी
.श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय -एव्हरी नाइट इन माय ड्रीम्स
.कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय- सफर
रविवार, २३ जानेवारी, सकाळी ९ ते १२
.प. भू. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी-कला ?
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर- सहल
आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालय- केप्लिट व्हॉईड
रविवार, २३ जानेवारी, सायंकाळी ५ त ८
.आय. एम. सी. सी.- वरात
.बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय- मंजम्मापुराणम्
.मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड-भाग धन्नो भाग