हॅन्ड सर्जरीवरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून
पुणे: हॅन्ड सर्जरी इंडिया संस्थेच्या वतीने हातांच्या शास्त्रक्रिया या विषयावर तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात २६ ते २८ जुलै २०२४ या दरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशभरातील डॉक्टर सहभाग घेणार आहेत. उद्या शुक्रवारी (दि. २६) सकाळी ९ वाजता जगप्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
या परिषदेत हातांच्या शस्त्रक्रियेशी संबंधित जवळपास ८० विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. हाताच्या दुखापतींचे व्यवस्थापन, वाकडेपणा, हाताला लकवा, जन्मजात विकृती, हाताला मुंग्या येणे, अर्धांगवायू, जळालेले व भाजलेले हात, त्यावरील शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर्समधील गुंतागुंत, अपघातांमुळे झालेल्या विकृती, अंगठ्यांची पुनर्स्थापना, हाताच्या कॉन्ट्रॅक्चर्स (कठीणपणा) यांचे निराकरण आणि कापलेल्या अंगठ्यांची पुनर्निर्मिती आदींवर चर्चा होईल. हॅन्ड सर्जरी तज्ज्ञांकडून शिकण्याची, त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्याची आणि हॅन्ड सर्जरीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी या परिषदेत मिळणार आहे.