स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादन; श्री गौड ब्राह्मण समाजातर्फे चारभुजा नाथ मंदिराचे लोकार्पण
पुणे : “विविध जाती-धर्म, समाज, संप्रदाय, संस्कृतीने गुंफलेल्या माळेने भारतमाता अलंकृत आहे. श्री गौड ब्राह्मण समाज याच माळेतील एक महत्वाचे फुल असून, हिंदुत्वाचा अंश आहे. देशभरात विखुरलेल्या या समाजाने संघटित होत भगवान श्री चारभुजा नाथाचे मंदिर उभारले, ही आनंदाची गोष्ट आहे. समाजात भावभक्ती, एकोपा, सात्विक वृद्धी, तसेच भारतमातेचा उत्कर्ष व्हावा, यासाठी श्री गौड ब्राह्मण समाजाने योगदान द्यावे,” असे प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
श्री गौड ब्राह्मण समाजाच्या पहिल्या शिखरबंद मंदिराचे कोथरूड येथे अनावरण आणि श्रीचारभुजा नाथाची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या उपस्थितीत झाली. प्रसंगी दत्तसेवा मंडळ व कर्मयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगीराज भाऊ महाराज परांडे, स्वामी स्वरूपानंद, महंत श्री आनंदपुरीजी महाराज, सद्गुरू नंदानंदजी महाराज, योगीराज ब्रह्मचारी अवधेश चैतन्यजी महाराज, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांनी शुभाशीर्वाद दिले.
श्री गौड ब्राह्मण समाज चतुःशृंगी मंडळ कोथरूडचे अध्यक्ष भवरलाल धर्मावत, कार्याध्यक्ष राकेश शर्मा (ओझा) यांच्यासह अन्य पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर आदी राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी चारभुजा नाथ यांचे दर्शन घेऊन श्री गौड ब्राह्मण समाजाच्या या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. चारभुजा नाथ प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने नामांकित भजन कलाकार प्रकाश माळी ,आशा वैष्णव, शंकर टॉक यांची भजनसंध्या, शोभायात्रा, संत-महंतांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ” राजस्थानमधील चार तीर्थांपैकी एक असलेल्या या भक्ती केंद्राचे बांधकाम या परिसराच्या अलंकारात भर घालणारे आहे. मंदिर उभारल्यानंतर नित्यनियमाने देवाकडे येणेही महत्वाचे आहे. समाजाचे काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. समर्पित वृत्तीने काम करावे लागते. या पिढीने मंदिराची उभारणी केली. मात्र, पुढील पिढी याच भक्तिभावाने सेवा करेल का, यावर विचार केला पाहिजे. मोबाईलवर गुंग असलेल्या तरुण पिढीला सन्मार्गावर आणण्याचे काम करावे लागेल. चांगले संस्कार, धार्मिक भाव, सात्विक बुद्धी वृद्धिंगत होण्यासाठी हे चारभुजा नाथ देवस्थान प्रेरणेचे केंद्र ठरेल.”
“धर्माच्या नावावर होणारे राजकारण बाजूला ठेवून देशात गुण्यागोविंदाने कसे नांदता येईल, यावर समाजधुरीणांनी काम केले पाहिजे. देशातील, समाजातील वातावरण बिघडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. सध्या सुरु असलेले वातावरण समाज व देशाच्या हिताला अनुकूल नाही. राजकारणासाठी समाज तोडण्याचा प्रयत्न कोणीही करता कामा नये. प्रभू श्रीराम सर्वांना एकत्रित घेऊन जाणारा प्रेरणास्रोत आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.