पुणे : “समाजात चांगल्या अर्थाने बदल घडण्यासाठी समिती कार्यरत आहे. गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून आम्ही समाजात ऑक्सिजन पेरतो. समितीच्या मदतीने घडलेले विद्यार्थी, समितीशी जोडलेले कार्यकर्ते याच विचारातून काम करतात. रोश कंपनीने सीएसआरमध्ये समितीला दिलेली ही देणगी महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक विचारातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी त्यांनी लावलेला हातभार आनंददायी आहे. देणगीच्या माध्यमातून रोश कंपनी समितीशी जोडली गेली असून, आपल्यातील हे नाते दीर्घकाळ राहील,” असे उद्गार विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी काढले.
सामाजिक उत्तरदायित्व योजनेखाली (सीएसआर) रोश कंपनीने विद्यार्थी साहाय्यक समितीला २४ लाख ६० हजारांची देणगी दिली. त्याचा धनादेश शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मंडळाच्या बैठकीत सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रतापराव पवार बोलत होते. कंपनीचे इंडिया हेड श्री. राजा, सीएसआर प्रतिनिधी कृष्णपाल सिंग, ज्ञानेश्वर घुगे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.
देणगीमागची भावना व्यक्त करताना श्री. राजा म्हणाले, “केवळ पैसे देणे एवढाच आमचा यामागचा उद्देश नाही, तर त्यातून समाजात परिवर्तन झाले पाहिजे, असा आमचा उद्देश असतो. समितीचे काम खूप चांगले आहे. विद्यार्थ्यांना घडवताना त्यांना उद्योजकतेचे धडे देण्याचे आपले प्रयत्न बदलत्या काळाशी सुसंगत आहेत. या कामाला आर्थिक मदत तर करूच, पण थेट या कामातही मदत करायला आम्हाला आवडेल.” कृष्णपाल सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.