कोरोना काळात सामाजिक संस्थांचे कार्य उल्लेखनीय
मालोजीराजे छत्रपती यांचे प्रतिपादन; ‘डिसायफर’तर्फे सुरेंद्र पठारे फाउंडेशनचा सन्मान
पुणे : “कोरोनाच्या या कठीण काळात सामाजिक संस्थांनी केलेले कार्य मोलाचे आहे. रक्तदान, लसीकरण मोहीम, घरांचे निर्जंतुकीकरण, प्लाझ्मादान शिबीर, स्वच्छता जागृती, आरोग्य तपासणी व मार्गदर्शन अशा विविध उपक्रमातून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने केलेले काम उल्लेखनीय आहे. कोरोनासारख्या संकटकाळात एकजुटीने काम करणे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मानद सचिव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले.
प्रतिमा निर्मिती व सल्लागार क्षेत्रात कार्यरत ‘डिसायफर क्लाउड अँड मार्केटिंग सोल्युशन्स’तर्फे कोरोना काळातील योगदानाबद्दल सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे संस्थापक सुरेंद्र पठारे व सहकाऱ्यांचा सन्मान पाषाण रस्ता येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी ‘डिसायफर’च्या प्रमुख ऐश्वर्या पाटील, अमोल जैन, पुरुषोत्तम भाईगडे, एआयएसएसएम हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. सोनाली जाधव, साशा शेळके आदी उपस्थित होते. प्रसंगी ‘डिसायफर’च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, “समाजाभिमुख कार्य करणे गरजेचे आहे. सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याचा गरजू लोकांना फायदा होतो. सुरेंद्र पठारे फाऊंडेशन ने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपण जे काम करतो ते समाजहिताचे, ग्राहकाच्या हिताचे असावे. ग्राहकांना चांगली सेवा देणाऱ्या संस्थांकडे लोक येतात. आपल्या कामात सातत्य, प्रामाणिकपणा, सचोटी, निष्ठा कायम असावी.”
सुरेंद्र पठारे म्हणाले, “निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेतली, याचा आनंद आहे. राजेंच्या हातून झालेला सन्मान आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे. फाउंडेशनचे हे कार्य यापुढेही अविरत चालू राहील.” ऐश्वर्या पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.