आठवे डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन २४ ऑक्टोबरपासून

आठवे डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन २४ ऑक्टोबरपासून

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

प्राची अरोरा व आनंद गोरड यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित आठवे आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शन दि. २४ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी पुणे येथे होणार आहे. येत्या गुरुवारी (दि. २४) सकाळी १०.३० वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या एक्स्पोचे उद्घाटन होणार आहे. गोकुळ दुध संघांचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक डॉ. चेतन नरके, चितळे बंधू मिठाईवालेचे इंद्रनील चितळे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित रहाणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

डेअरी व पशुखाद्य निर्मिती व्यावसायिकांनी, युवक, युवतींनी या संधीचा लाभ घेत प्रदर्शनाला भेट देऊन आपला व्यवसाय अत्याधुनिक व वृद्धिंगत करावा, अशी माहिती संयोजक, बेनिसन मीडियाच्या प्राची अरोरा व सहयोगी आनंद गोरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष डॉ. सुजीत कुलकर्णी, जाफा फूडचे अमिया नाथ, गोकुळ दूधचे विक्री व पणन अधिकारी सुजय गुरव, चितळे बंधू मिठाईवाले येथील संशोधन अधिकारी डॉ. वैभवी पिंपळे आदी उपस्थित होते.

प्राची अरोरा म्हणाल्या, “प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून, बेनिसन मीडियातर्फे याचे आयोजन केले जाते. या डेअरी व फिड प्रदर्शनात अभ्यासपूर्ण सेमिनार्स, वर्कशॉप्स, चर्चासत्रांसह गोठा व्यवसाय, जनावरांचे आरोग्य व आहार व्यवस्थापन, क्लीन मिल्क प्रोडक्शन, लॅबोरेटरी सेटअप, लॅब तपासणीच्या पद्धती, डेअरी प्लांट मशीनरी, दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, आईस्क्रीम व मिठाई उत्पादन, पॅकेजिंग व साठवणूक तंत्रज्ञान, डेअरी प्रॉडक्ट्स निर्यातीमधील संधी, डेअरी व्यवसाया व आयातनिर्यात, पशुखाद्य निर्मिती तंत्रज्ञान, मशीनरी सेट-अप, कच्च्या मालाची निवड व फॉर्मुलेशन, पोल्ट्री, मत्स्य व पशुखाद्य मार्केटची स्थिती अशा डेअरी व पशुखाद्य निर्मिती उद्योगासंबंधीच्या देशविदेशामधील सुमारे १०० कंपन्यांच्या मशिनरींची प्रात्यक्षिके पाहता येतील. तज्ञांसोबत थेट संवाद साधून या क्षेत्रातील अर्थकारण समजून घेता येईल. तसेच शासकीय योजना व कायदेशीर बाबीचीही माहिती दिली जाईल.”

आनंद गोरड म्हणाले, “भारत हा कृषिप्रधान व दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे. देशातील बहुतांश ग्रामीण अर्थकारण, तसेच काही भागातील उदरनिर्वाह दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत दूध उत्पादन व त्याच्या गुणप्रतीमध्ये कमालीची सुधारणा झाल्याने विदेशातूनही दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढत आहे. देशातील जनतेची क्रयशक्ती व आरोग्याप्रती पौष्टिक खाद्याविषयी जागृती वाढल्याने दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही वाढले आहे. त्यातून व्यावसायिक संधी वाढल्या आहेत. ग्रामीण सुशिक्षित युवक, युवती दूध उत्पादनासोबतच स्वतःचे दुग्धजन्य पदार्थ निर्मित करून गावाजवळील बाजारपेठामध्ये, पर्यटन व धार्मिक स्थळामध्ये, एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनसमोर स्वतःच्या ब्रँडच्या डेअरी उत्पादनांची विक्री केंद्रे सुरु करून ग्राहकांना व हॉटेल रेस्टोरंट, ढाबे यांना पुरवठा करण्याच्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येते.”

“छोट्या-मोठ्या दूध उत्पादन, संकलन व प्रक्रिया करणारे प्रकल्पधारक, पोल्ट्री व मत्स्य पालन करणारे उद्योजक हे स्वतःचे छोटे किंवा मध्यम क्षमतेचे फिड उत्पादन युनिट सुरु करून अधिक नफा मिळवीत आहेत. गावी दूध संकलन करणारे उद्योजक दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक, वितरण, विक्री यासारखे व्यवसाय करीत आहेत. यामुळेच अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकून घेण्यासाठी, डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनांना ग्रामीण युवकांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच असून प्रदर्शनांमधील प्रत्यक्षिके पाहून व विविध वर्कशॉप, सेमिनार्स, चर्चासस्त्रे यांमध्ये ग्रामीण युवक, युवती फार मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेत आहेत. आपल्या प्रकल्पामधील शिल्लक उत्पादन क्षमतेच्या संधी मिळण्यासाठी, उत्पादित मालाला स्थानिक, राष्ट्रीय व तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळवता येईल यासंबंधीची माहिती या प्रदर्शनांमध्ये देण्यात येणार आहे,” असे आनंद गोरड यांनी नमूद केले.

आपटे रस्ता: पत्रकार परिषदेत डेअरी अँड फीड एक्स्पोची माहिती देताना प्राची अरोरा. यावेळी डावीकडून डॉ. सुजित कुलकर्णी, अमिया नाथ, अरोरा, आनंद गोरड, डॉ. वैभवी पिंपळे व सुजय गुरव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *