भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत सहाव्या ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे शानदार उद्घाटन

भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत सहाव्या ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे शानदार उद्घाटन

पिंपरी-पुणे : ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या सहाव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. येत्या ९ मार्चपर्यंत चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजक कन्वल खियानी, हितेश दादलानी, कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी आदी उपस्थित होते.
 
राहुल त्रिपाठी म्हणाला, “क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे. सर्व कुटुंबाना एकत्र आणून उत्साहाने ही स्पर्धा खेळली जात आहे. मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवेत. सिंधी समाजाने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. खेळाडूंबरोबर त्यांची मुले मैदानात आल्याने वातावरणात ऊर्जा संचारत आहे. समाजातील तरुणांमध्ये खेळभावना रुजवण्यासाठी ही लीग महत्वाची आहे. संघभावना आणि प्रामाणिकपणे या खेळाचा आनंद घ्यावा.”
 
कन्वल खियानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पुरुष गटात एकूण १६, तर महिला गटात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी, तर महिला संघांची नावे नद्यांशी निगडित आहेत. महिलांमध्ये ९०, तर पुरुषांमध्ये २५१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.”
 
या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स व पिंपरी योद्धाज, तर महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स, यमुना स्ट्रायकर्स, नर्मदा टायटन्स, कृष्णा सुपरनोव्हाज आणि इंद्रायणी थंडरबोल्ट्स यांचा समावेश आहे.
 
उद्घाटनाचा सामना सिंधफूल रेंजर्स आणि सुलतान्स ऑफ सिंध यांच्यात रंगला. पहिल्याच लढतीत सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये सिंधफूल रेंजर्सने विजय मिळवला. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून रेंजर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर चिराग निरंकारी व दिनेश रिझवानी यांनी धमाकेदार सुरुवात करत ३७ धावांची सलामी दिली. निरंकारीने १५ चेंडूत ४ षटकार व एक चौकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या. १३ चेंडूत २ षटकार व १ चौकार मारत राम पोपटानी याने २५ धावांची खेळी केली. ९ षटकांत ५ बाद ८६ धावा करून रेंजर्सने सुलतान्ससमोर विजयासाठी ८७ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात सुलतान्सचे सलामीवीर राजीव अहुजा (५ चेंडूत ११) व पियुष रामनानी (२४ चेंडूत ४९) यांनी स्फोटक खेळी केली. रामनानीने ५ षटकार व ३ चौकार लगावले. एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. धावांचे लक्ष्य गाठताना त्यांनाही ८६ धावांच करता आल्याने सुपर ओव्हर झाली. सुलतान्स ऑफ सिंधने ९ धावा करत १० धावांचे आव्हान दिले. सिंधफूल रेंजर्सने ५ चेंडूंतच १० करत विजय मिळवला. दिनेश रिझवानी सामनावीर ठरला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *