आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पुणे: “बांधकाम क्षेत्रात नवीन पद्धतीचे प्रकल्प स्पर्धात्मक भावनेने उभे रहात आहे. देशाच्या प्रत्येक शहरात पायाभूत सुविधा निर्माण होत असून, त्यामध्ये आर्क्टिकेट बहुमूल्य योगदान देत आहेत. इंजिनिअर आणि आर्क्टिकेट यांची देशाला नवीन आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित यांनी केले.
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे (एईएसए-एसा) आयोजित ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात पुरोहित बोलत होते. एनडीए रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स येथे झालेल्या या सोहळ्यावेळी आर्कि. संजय तासगावकर, ‘एईएसए’चे चेअरमन आर्कि. महेश बांगड, अध्यक्ष आर्कि. राजीव राजे, संयोजक इंजि. पराग लकडे, आर्कि. विश्वास कुलकर्णी, इंजि. जयंत इनामदार आदी उपस्थित होते. प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै व अशोक बेहेरे यांना ‘एईएसए’चे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
आर्कि. अभय पुरोहित म्हणाले, “एखाद्या शहराची, भागाची, देशाची ओळख ही तेथील पायाभूत सुविधा, विकास यावरून होत असते. देश विकासाच्या वाटेवर असताना त्यापद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाही, तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित घटकांनी यापुढेही भरीव योगदान देत राहावे. ‘एईएसए’ ही संस्था ५० वर्ष जुनी असून, यामध्ये वेगवेगळे इंजिनिअर्स, आर्किटेक्ट जोडले गेले आहेत. व्यावसायिकांनी एकत्रितपणे चांगले काम केल्यास कोणतेही काम मोठे किंवा छोटे असा भेदभाव राहत नाही. पुढील चार दशकात देश मोठ्या प्रमाणात विकास साधणार आहे. त्याचे साक्षीदार व साथीदार होण्याची संधी आपल्याला आहे.
आर्कि. अंकुर कोठारी यांना ‘रोहन यंग अचिवर्स अवॉर्ड’, फिनिक्स अकीला टॉवरला पुणे शहराबाहेरील ‘नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. राहुल गोरे (हाउस ऑफ अँम्बी व्हॅली) यांना ‘सिंगल रेसिडेशनशियल प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. ओंकार काळे यांना पुण्यात ‘नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार’, आर्कि. रवी कान्हेरे यांना ‘नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार’, आर्क्टि. हेमंत महाजन यांना ‘नॉन रेसिडेन्शियल अडॅप्टिव रियूज प्रकल्प पुरस्कार’ व ‘रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार’, पुण्यातील ‘सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार’ आर्कि. दर्शन मेढी, आर्कि. विनोद दुसिया यांना ‘पुणे रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टी टेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार’, तर आर्कि. सितेश अग्रवाल यांना ‘रेसिडेन्शियल ग्रुप हौसिंग पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अशोक बेहेरे, विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आर्कि. पराग लकडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. आर्कि. आलोका काळे व आर्कि. मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले. आर्कि. महेश बांगड यांनी आभार मानले.