पोलिसांचा बंदोबस्त पौष्टिक जेवणामुळे ऊर्जादायी

पोलिसांचा बंदोबस्त पौष्टिक जेवणामुळे ऊर्जादायी

संदीप सिंग गिल यांचे प्रतिपादन; लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागतर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार

पुणे : “गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सलग २४-२५ तास अहोरात्र गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करण्याचा लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचा उपक्रम स्तुत्य आहे. या श्रमपरिहार केंद्रामुळे पोलीस बांधवाना घरच्यासारखे ताजे, स्वादिष्ट व पौष्टिक जेवण, स्वच्छ पाणी मिळते. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा, सुरक्षारक्षकांचा आणि पोलिस मित्रांचा बंदोबस्त ऊर्जादायी ठरतो,” असे प्रतिपादन पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी केले. 
 
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन गिल यांच्या हस्ते झाले. गेल्या १८ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. याप्रसंगी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल विजय भंडारी, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, डिस्ट्रिक्ट सीईओ श्याम खंडेलवाल, कॅबिनेट ट्रेजरर राजेंद्र गोयल, आनंद आंबेकर, झोन चेअरपर्सन संतोष पटवा, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष कल्पेश पटनी, चैताली पटनी, सचिव विशाल शहा, खजिनदार चंद्रकांत लोखंडे यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस बांधव अथक परिश्रम करतात. त्यांना बंदोबस्त करण्यासाठी उत्साह टिकून राहावा, ऊर्जा मिळावी, यासाठी हा उपक्रम फतेचंद रांका यांच्या पुढाकारातून जवळपास दोन दशकांपासून सुरू आहे. या उपक्रमामुळे पोलिसांना नवसंजीवनीच मिळते.”
 
विजय भंडारी म्हणाले, “लायन्स क्लब नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहत आहे. एकदा सुरु केलेला उपक्रम पदाधिकारी बदलले तरीही अखंडपणे सुरु राहतो. पोलीस बांधवांची सेवा करण्याचा हा प्रयत्न असतो. त्यांना या पौष्टिक जेवणामुळे बंदोबस्त करताना थकवा येत नाही. रांका व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.”
 
फत्तेचंद रांका म्हणाले, “विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम आम्ही गेल्या १८ वर्षापासून राबवत आहोत. जवळपास दीड-दोन हजार पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि रांगोळीच्या पायघडया घालणारे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक यांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ५०० ते ६०० लोक जेवण करतात.”

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *