पुस्तकाच्या दुकानात पुस्तके आणून देणारा वर्कर ते आज पुण्यामधील पुस्तकांच्या तीन दुकानांचा मालक…….!

पुस्तकाच्या दुकानात पुस्तके आणून देणारा वर्कर ते आज पुण्यामधील पुस्तकांच्या तीन दुकानांचा मालक…….!

आपुलिया हिता जो असे जागता ! धन्य माता पिता तयाचिया !
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ! तयाचा हरिख वाटे देवा !!

ही गोष्ट हाय एका अवलियाची. ज्याचं गाव उरुळी कांचन. घरी शेती जेमतेम पोट भरण्याएवढी. आई व वडील अशिक्षित. कॉलेजला जाऊ लागला पण कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत. जिथे कॉलेजची फी भरायला पैसे नाहीत तिथे परगावी राहण्याचा आणंं खाण्याचा खर्च कसा होणार. तिथे तुषार रंजनकर ह्यांसारख्या भल्या माणसाने त्यांचा सांभाळ केला. स्वताच्या घरी ठेवून सांभाळलं. आता शिक्षण पुर्ण केल. पुढे रंजनकर सरांनी एका पुस्तकाच्या दुकानात काम कर म्हणून सांगितले. मग पुण्यातील एका नामांकित दुकानात प्रकाशकाकडून व वितरकाकडून पुस्तके आणून देण्याचे काम हा माणूस करु लागला. हळूहळू आपले काम तो करु लागला. पुढे गरजा वाढू लागल्या. तशी पैशाची गरज भासू लागली. ज्या पुस्तकाच्या दुकानात कामाला होता त्या मालकाला फक्त १००० रुपये पगार वाढ करा म्हणून सांगितले. त्यांनी ती पगारवाढ केली नाही आणि यामुळे तेथून तो बाहेर पडला. पुढे लग्न झाले. लग्न झाले खरे पण हाती काही काम नाही. पैसे जवळ नाही. घरचा प्रपंच चालू लागला तो स्वतःच्या पत्नीच्या ७०००/- रुपयांच्या पगारी कामावर. यावेळी नैराश्यामध्ये हा माणूस होता. मग एक वितरण संस्था त्यांनी चालू केली. बाकीच्या प्रकाशनाची पुस्तके ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरुन विकू लागला. मसाले विकू लागला. या दरम्यान काही प्रकाशकांकडून चुकीची वागणूक मिळायची. मग काय स्वतःचेच प्रकाशन काढायचे ठरवले आणि नाव ठेवले Rudra Enterprises.

 
       पहिलेच पुस्तक प्रकाशित झाले ते मधुरा ताईंचे. मधुराज रेसिपी या नावाने. तसे पाहिले तर कुठल्याही प्रकाशकाच्या पहिल्याच पुस्तकाला एवढा प्रतिसाद मिळणार तेवढा प्रतिसाद या पुस्तकाला मिळाला. चार महिन्यांत चार आवृत्त्या संपल्या पण. अमेझॉन इंडियाने पुस्तकाला बेस्ट सेलरचा पुरस्कार दिला. दुसरे आणि तिसरे पुस्तक प्रकाशित झाले ते आमचे मित्र प्रेम धांडे आणि वैभव साळुंके यांचे. या दोन्ही पुस्तकांनी तशीच झेप घेतली. यात विशेष बाब अशी की ज्या पुस्तकाच्या दुकानात हा माणूस कामाला होता आता त्याच दुकानात या माणसाच्या प्रकाशनाची पुस्तके बेस्ट सेलर च्या काऊंटरवर आहेत. हा असतो संघर्ष आणि मेहनतीचा प्रवास. बापाच्या जीवावर स्वताच्या प्रसिध्दी साठी ऐश करणारे पोरं कुठं आणि स्वतःच्या मेहनतीवर आपलं अस्तित्व उभं करणारी पोर कुठं. पहिले शॉप नऱ्हे दुसरे अप्पा बळवंत चौक पुणे आणि आता कोथरूड येथे पुस्तकाची दुकाने. एवढा मोठा लांबचा पल्ला गाठलाय या माणसाने. या प्रवासात अधूनमधून या सरांशी चर्चा होत राहिली. सरांना पुस्तकांविषयी मी आणि माझे मित्र वैभव साळुंके माहिती देत होतोच. यातूनच सरांनी पुस्तक विक्री आणि प्रकाशनामध्ये आम्हाला आणले. नाहीतर आमची हिंमत होत नव्हती. आमच्यासारख्याला उभं करण्यात त्यांचा हात आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढा मोठा संघर्ष असून देखील हा माणूस प्रसिद्धी नावाच्या गोष्टीपासून लांबच राहिला. कधी कोणाला चुकीचा शब्द ना कोणावरती रागाने बोलणे. नम्र होऊन प्रत्येकाशी बोलणे. …एक चांगल्या लेव्हलला काम करु हे या माणसाचं घोषवाक्य. तुम्ही यशाच्या किती उंचीवर पोहचलात हे महत्त्वाचं नाही या उंचीपर्यंत तुम्ही किती जणांना सोबत नेले हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. हेच त्यांना लागू पडते. माझ्या पुस्तकाला पहिल्याच शब्दात बिनशर्त होकार देणारा माणूस. आमच्यासारख्यांना पण ते सोबत घेऊन चालत आहेत. आता आम्ही यांच्या प्रकाशनात कामाला आहोत याचा अभिमान वाटतोय.

आणि या अवलियाच नाव म्हणजे नवनाथ जगताप……
त्यांच्या कोथरूड येथील पुस्तकविश्व नावाच्या शाखेसाठी खुप खुप शुभेच्छा………!

– सुशांत संजय उदावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *