पुणे : “आपल्या जडणघडणीत कुटुंबियांकडून, समाजाकडून खूप काही मिळत असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता जपत मानवतेच्या भावनेतून समाजहिताचे काम करण्याची गरज आहे. माझे वडील रसिकलाल धारिवाल यांनी सामाजिक भान आणि दातृत्वाची शिकवण दिली. त्यामुळे समाजासाठी थोडेफार योगदान देऊ शकलो. या पुरस्काराने आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा दिली आहे,” अशी भावना माणिकचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली.
जय आनंद ग्रुपतर्फे प्रकाश धारिवाल यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी साधना सदनचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक विजयकांत कोठारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी, सुनील बाफना, जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष विजय चोरडिया, शांतीलाल नवलाखा, ईश्वर बोरा, प्रवीण तालेडा आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम नगरसेवक म्हणून प्रवीण चोरबेले, बाळासाहेब ओसवाल यांचा तर कुशल संघटक म्हणून ऍड. अभय छाजेड यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रकाश धारिवाल म्हणाले, “लहानपणासून मुलांवर समाजहिताचे कार्य करण्याचे संस्कार व्हावेत. वडिलांच्या आदर्शावर चालणे हे मुलाचे कर्तव्य असते. मलाही वडील रसिकलाल यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. त्यातून समाजहिताचे काम करण्याची प्रेरणा मिळाली. समाजाने खूप दिले आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो. अहंकार न बाळगता मानवतेच्या भावनेतून आपण काम करावे. कोणाचे चांगले करता येत नसेल, तर किमान वाईट करण्याचा विचार आपल्या मनात येता कामा नये. अहिंसा, विवेक, परस्पर सहकार्य या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत.”
https://youtu.be/KdKceFETPb0
विजयकांत कोठारी म्हणाले, “धारिवाल परिवाराने समाजासाठी भूषणावह काम केले आहे. अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी समाजाप्रती बांधिलकी जपली आहे. रसिकलाल यांच्याप्रमाणेच प्रकाश यांचे कार्य तेजोमय आहे. सामाजिक कार्याचा हा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम प्रकाशशेठ यांनी केले आहे. त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांनी प्रेरणा घेऊन काम केले, तर चांगले कार्य उभा राहील. चोरबेले, ओसवाल आणि छाजेड यांनी राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला आहे.”
आनंदमल छल्लानी, ललित गांधी, विजय भंडारी यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली. स्वागत प्रास्ताविकात विजय चोरडिया यांनी जय आनंद ग्रुपच्या उपक्रमांविषयी, तसेच समाजभूषण पुरस्काराविषयी माहिती दिली. शांतीलाल नवलखा यांनी मानपत्र वाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार मर्लेचा यांनी केले. प्रवीण तालेडा यांनी आभार मानले.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                