घनकचऱ्याचे व्यवस्थापन सोसायटीत करण्याची गरज

घनकचऱ्याचे व्यवस्थापन सोसायटीत करण्याची गरज

मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘घर व गृहसंकुलातील घनकचरा व्यवस्थापन’वर प्रात्यक्षिकासह व्याख्यान

पुणे : “ओला व सुका कचरा वेगळा करणे हे तर आपले कर्तव्यच आहे. त्याबरोबरच सुका कचरा, प्लॅस्टिक आणि इतर असे वर्गीकरण आवश्यक आहे. घनकचऱ्याचे सोसायटीत व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत तज्ज्ञांनी मांडले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे ‘घर व गृहसंकुलातील घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. बदलती जीवनशैली, शहरीकरण यामुळे वाढत्या कचऱ्याचे नियोजन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी जैवतंत्रज्ञान वैज्ञानिक डॉ. प्रबीर घोष, ग्रीन थंब संस्थेचे फिर्दोष रुवाल्ला, अभियंता नीलम केणी या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सराफ, माजी अध्यक्ष प्रा. विनय र र, कोषाध्यक्ष शशी भाटे, कार्यवाह संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.

डॉ. प्रबीर घोष यांनी घरच्याघरी कंपोस्ट खत तयार करण्याचे फायदे व अडचणी सांगितल्या. ते म्हणाले, “वाढत्या प्रमाणातील कचरा कुठे जमा करावा, हा प्रश्न कमी होतो. त्यातून कोणताही दुर्गंध येत नाही. प्रदूषणात भर पडत नाही. शेतीसाठी, बागेसाठी खत तयार होते. रासायनिक शेतीला हा उत्तम पर्याय आहे. तसेच याचे मोठे फायदे म्हणजे घरपट्टीमध्येही सुट मिळते. खताची विक्री करून उत्पन्न मिळते. योग्य पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण करून हा प्रयोग अमलात आणावा.”

सुका कचराविषयी नीलम केणी म्हणाल्या, “माझ्या घरचा किंवा सोसायटीचा कचरा जातो कुठे, याचा विचार करायला हवा. सुका कचऱ्याचे वर्गीकरण, तसेच पुनर्वापर करावा. परिणामी, प्लॅस्टिक निर्मिती, प्रदूषण कमी होईल. सुका कचरा वर्गीकरण करून विकला जाऊ शकतो. त्यातून सोसायटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. यासाठी व्यवस्थापन समितीचे सहकार्य गरजेचे असते. स्वतःबरोबर कचरा वेचक आणि इतरांचीही काळजी घ्यायला हवी.”

ओल्या कचऱ्यावर मार्गदर्शन करताना फिर्दोष रुवाल्ला म्हणाले, “महाराष्ट्राच्या तिप्पट भागात पॅसिफिक समुद्रात १२ लाख चौरस फूट प्लास्टिक जमा झाले आहे. कचरा प्रश्नामुळे देवाची उरळी येथे मुलांचे लग्न ठरणे कठीण झाले आहे. त्यामुळे घरातील, सोसायटीतील कचरा व्यवस्थापन करणे अनिवार्य झाले आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याची आणि निसर्गाचे संवर्धन करण्याची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचा त्यात पुढाकार महत्वाचा आहे.”

प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, “समाज सुधारणेच्या तळमळीने व पर्यावरण संरक्षणासाठी हे लोक काम करत आहेत. सुरुवात स्वतः पासूनच करायला हवी. हे काम फार मोठे होणे गरजेचे आहे. जागरुकता वाढणे आवश्यक आहे. आपण प्रयोगशील झालो, तर प्रत्येकजण खूप काही करू शकतो.” विनय र. र. यांनी प्रास्तविक केले व वक्त्यांचा परिचय करून दिला. शशी भाटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *