संगीत मेघदूत’चे सोमवारी (दि. १९) रोजी आयोजन
पुणे : महाकवी कालिदास रचित मेघदूत या महाकाव्यावर आधारित काव्य, स्वर आणि ताल या त्रिबंधातील ‘संगीत मेघदूत’ या सांगीतिक महोत्सवाचे येत्या सोमवारी (दि. १९) सायंकाळी ७.३० वाजता सदाशिव पेठेतील नारद मंदिरामध्ये आयोजन केले आहे.
वनस्पती शास्त्रज्ञ व कवी डॉ. मंदार दातार आणि संगीतकार अमोल काळे यांच्या कल्पनेतून ‘संगीत मेघदूत’ साकार झाले आहे. कार्यक्रमाची संहिता डॉ. मंदार दातार यांनी लिहिली असून, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या अनुवादाला अमोल काळे यांनी संगीतबद्ध केले आहे. कालिदास दिनी अर्थात आषाढाच्या पहिल्या दिवशी २००४ पासून सातत्याने हा कार्यक्रम सादर होत आहे.
कुसुमाग्रजांनी केलेला मराठी अनुवाद, त्यातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ, श्लोकात असलेली वेळ लक्षात घेत त्याप्रमाणे रागदारीचा वापर करत अमोल काळे यांनी संगीत दिले आहे. खंजिरी, दिमडी, चायना ब्लॉक, घटम, डफ अशा अनेक तालवाद्यांचा नाद अनुभवता येणार आहे. श्लोकांसह यक्ष वाचनही होणार आहे. गौरव बर्वे ते करणार आहेत.
अमोल काळे, डॉ. किरण रणदिवे, विजय काळे, स्वामीनी कुलकर्णी यांचे गायन, महेश कुलकर्णी, रुद्र जोगळेकर व अनघा फाटक यांचे तबलावादन, स्वामिनी कुलकर्णी (सिंथेसायझर) व ओवी काळे आणि मोहिनी कुलकर्णी (तालवाद्य) यांचे वादन होईल.