कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा

कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा

सुरेश कोते यांचे प्रतिपादन; ‘एमटीपीए’तर्फे १५ व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

पुणे : “कर सल्लागार हा शासन आणि करदाते यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. लोकांना कर भरण्यासाठी प्रेरित करण्याची भूमिका कर सल्लागारांनी निभवावी. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून देण्यासाठी कर सल्लागारांनी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने आयोजित १५ व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश कोते बोलत होते. शिवाजी रस्त्यावरील ‘एमटीपीए’च्या सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, सचिव ज्ञानेश्वर नरवडे, अभ्यासक्रम चेअरमन स्वप्नील शहा, समन्वयक मिलिंद हेंद्रे, अमोल शहा, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, मिलिंद भोंडे, सीए अविनाश मुजुमदार, व्ही. एन. जोशी, ऍड. व्ही. जी. शहा, पदाधिकारी अनुरुद्र चव्हाण, अश्विनी बिडकर, अश्विनी जाधव, ऍड. उमेश दांगट आदी उपस्थित होते.

सुरेश कोते म्हणाले, “कर सल्लागार हे स्वयंरोजगार देणारे शाश्वत क्षेत्र आहे. यातील बदल आत्मसात करत व्यवसाय वाढीसाठी सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हा व्यवसाय ज्ञानाधारित आहे. बदलती करप्रणाली समजून घेत करदात्यांना चांगली सेवा देण्यावर आपण भर दिला पाहिजे. शिक्षण तुम्हाला ओळख, मानसन्मान मिळवून देते. त्यामुळे जिज्ञासू, चौकस वृत्तीने सतत शिकत राहिले पाहिजे. कर सल्लागारांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी ‘एमटीपीए’ राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

“जगातील सर्वात मोठी महिलांची संस्था अशी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूहाची ओळख आहे. वेगळ्या विचारांवर उभा असलेल्या या संस्थेत आज देशभर ५० हजार महिला काम करताहेत. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थेला ६० वर्षे होत असून, या संस्थेशी जोडल्याचा आनंद आहे,” अशी भावना कोते यांनी व्यक्त केली.

अनिल चव्हाण म्हणाले, “आज सर्वत्र चांगल्या कर सल्लागाराची गरज आहे. कर प्रणाली आपण समजून घेतली पाहिजे. चांगली सेवा दिली तर कर सल्लागार म्हणून यशस्वी व्हाल. कर रचनेतील बारकावे समजून घेत क्लायंटला विश्वासार्ह सेवा देण्यावर आपला भर असला पाहिजे. ग्रामीण भागातील कर सल्लागारांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायला हवे.”

मिलिंद हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आभार श्रीपाद बेदरकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *