सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल

सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; जागतिक महिला दिनानिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’

पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, चित्रपटसृष्टीतील कलावंतांना सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते महिलांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केला.
 
नक्षत्रा बोत्रे (ब्युटी अँड वेलनेस), पियुषा दगडे पाटील (महिला सक्षमीकरण व लोकसेवा), पल्लवी जगताप (शिक्षण सेवा), उज्वला मारणे (सामाजिक कार्य), लीना खंडेलवाल (उद्योजिका व प्रेरक वक्त्या), पौर्णिमा लुनावत (सामाजिक कार्य), साक्षी दगडे पाटील (युवा उद्योजिका), डॉ. रश्मी बापट (आरोग्यसेवा व महिला सक्षमीकरण), दुर्गा भोर (सामाजिक कार्य), अश्विनी धायगुडे-कोळेकर (पत्रकारिता व निवेदन), सीए श्रुति काबरा-मुंदडा यांना सन्मानित करण्यात आले.
 
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसंगी अभिनेता-दिग्दर्शक गणेश आचार्य, ‘सूर्यदत्त’चे मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण जावळे, सागर पायगुडे, अभिनेता सुशांत थमके, अभिनेत्री विधी यादव, जाण्या जोशी आदी उपस्थित होते.
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “महिलांना योग्य सन्मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे. आपल्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा विविध रूपात महिलेचे योगदान मौल्यवान असते. त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. कुटुंबाला सांभाळून करिअर घडवण्याची क्षमता महिलांमध्ये असते. त्यांना योग्य सन्मान, संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर महिला समाजाच्या व राष्ट्राच्या विकासात मोलाची भूमिका निभावतील. ‘सूर्यदत्त’ संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची बीजे रोवली जातात. भारतीय मूल्ये, संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान येथील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.”
 
पल्लवी जगताप यांनी कवितेतून महिलांचे भावविश्व उलगडताना सांगितले की, शिक्षिका म्हणून मला माणूस, समाज घडविण्याची संधी मिळते याचा आनंद वाटत असल्याचे सांगितले. प्रत्येक मुलीला, महिलेला सन्मान देण्याचा संस्कार आम्ही देत आहोत. किशोरवयीन मुलांचे जीवन घडवण्यात शिक्षक मोलाची भूमिका बजावतात, असे त्यांनी सांगितले.
 
डॉ. रश्मी बापट म्हणाल्या, “आयुष्य साधे-सरळ जगता आले पाहिजे. जीवनात अडचणी येतील, पण त्यावर मात करून चांगले जगावे. जिजाऊ बनून शिवराय घडवण्याचे काम आपण केले पाहिजे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यावर आपण भर दिला पाहिजे. त्यासाठी योग्य व्यायाम, आहार याचा समतोल राखा.”
 
लीना खंडेलवाल म्हणाल्या, “महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून जिद्दीने स्वप्नपूर्तीया दिशेने काम करत राहिलो, तर येणाऱ्या आव्हानांवर मात करून यशाच्या मार्गावर जाता येते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता सक्षमपणे उभे राहिले पाहिजे.”
 
 
पौर्णिमा लुनावत म्हणाल्या, “प्रत्येक महिलेमध्ये अफाट शक्ती असते. त्यांच्यातील कलागुणांना, क्षमतांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तर त्या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात. मुलांसाठी आई हा आदर्श असते. त्यामुळे आपण मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी कार्यमग्न राहावे.”
 
दुर्गा भोर म्हणाल्या की, “स्वसंरक्षणासाठी महिलांनी सज्ज व्हायला हवे. कायद्याचे ज्ञान आत्मसात करून योग्य तिथे त्याचा वापर केला पाहिजे. प्रत्येकाने घरातील महिलेचा सन्मान करावा. महिलांनीही स्वतःला सर्वच बाजूनी सक्षम करण्यावर भर द्यायला हवा.”
 
उज्ज्वला मारणे यांनी स्त्री-पुरुष समानता अधिक महत्वाची असून, माझ्या प्रवासात पतीच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मला सामाजिक कार्यात चांगले योगदान देता येत असल्याचे नमूद केले. 
 
अंतर्मनाची आणि बाह्यरूपाची सुंदरता अधिक महत्वाची आहे. महिलांनी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे, असे नक्षत्रा बोत्रे यांनी सांगितले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *