…अन शिवसेनाप्रमुखांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना दिलेल्या वचनाची पूर्ती

…अन शिवसेनाप्रमुखांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना दिलेल्या वचनाची पूर्ती

फ्लेक्सच्या पैशांचा अपव्यय टाळत युवकांनी काश्मिरमध्ये उभारली ‘सावित्रीबाई फुले-फातिमा शेख ई-लर्निंग लॅब’

पुणे : राजकीय नियुक्तीनंतर शुभेच्छा देणाऱ्या फ्लेक्सच्या पैशांचा अपव्यय टाळून, त्यातून वाचवलेल्या पैशांतून पुण्यातील युवकांनी काश्मीरमधील दर्दपोरा या गावातील सरहद स्कूलमध्ये ‘सावित्रीबाई फुले-फातिमा शेख ई-लर्निंग लॅब’ उभारली आहे. या ‘ई-लर्निंग’ लॅबचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना दिलेल्या वचनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या उपस्थितीत वचनपूर्तता झाली.

सरहद, राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे प्रतिष्ठान या संस्थांच्या पुढाकारातून ही ई-लर्निंग लॅब उभारली असून, लोकार्पण सोहळ्यावेळी जम्मू काश्मिरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, राष्ट्रप्रथम ट्रस्टच्या विश्वस्त पूजा देसाई आदी उपस्थित होते.

वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ यांची दीड वर्षांपूर्वी शिवसेनेच्या पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभारी समन्वयकपदी निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या फ्लेक्सवर होणारा खर्च टाळून त्या पैशातून काश्मिरमधील दर्दपोरा गावातील सरहद स्कूलमध्ये ई-लर्निंग लॅब उभारण्याचे वाघ यांच्या मित्रपरिवाराने ठरविले होते.

या संदर्भात माहिती देताना वैभव वाघ म्हणाले, “दुर्दैवाने दर्दपोरा हे गाव विधवांचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून संजय नहार व सरहद संस्थेने सुंदर शाळा उभारलेली आहे. या शाळेत लॅब उभारण्याचे आम्ही ठरविले. योगायोग असा की, काही वर्षांपूर्वी संजय नहार सर काश्मिरी मुलांना मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला घेऊन गेले होते, तेव्हा बाळासाहेबांनी याच गावातील मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत किंवा दहा संगणक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुढे या गावातील समन्वयकांची आणि बाळासाहेबांची भेट न होऊ शकल्यामुळे हे राहून गेले होते. पण या उपक्रमामुळे बाळासाहेबांनी दिलेला शब्द पूर्ण झाला, याचे समाधान वाटतेय.”

या ई-लर्निंग लॅब बाबत संजय नहार म्हणाले,”अंगावर शेणाचे गोळे झेलत अनेक कष्टांनी सावित्रीबाई फुले ह्यांनी देशात स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. ह्या कामात सावित्रीबाई फुले ह्यांना फातिमा शेख ह्यांनी मोलाचे सहकार्य केले म्हणूनच या ई-लर्निंग लॅबला सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख ह्यांचे नाव देण्यामागे आमची कृतज्ञतेची भावना आहे. पुण्यातील युवकांनी कश्मिरमध्ये सुरु केलेली ही ई-लर्निंग लॅब राष्ट्रीय एकात्मतेचे देखील प्रतिक आहे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *