ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश गांधी यांचे प्रतिपादन; ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ प्रदान
पुणे : “अलीकडच्या काळात जोडण्यापेक्षा तोडण्याचे काम अधिक सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकमेकांच्या विरोधात होते, अशी मांडणी अयोग्य असून, हा कालखंड संवेदनशील लोकांसाठी चिंताजनक आहे. महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण का होत नाही आणि ते समजूनही का घेतले जात नाहीत, याचे आत्मपरीक्षण करायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरणप्रेमी डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रितम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बंधुता दिन व बंधुता काव्य महोत्सवाच्या समारोपावेळी डॉ. गांधी यांना पहिला ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सत्यशोधक पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित महोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कवी चंद्रकांत वानखेडे, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, काव्य महोत्सवाचे अध्यक्ष शंकर आथरे, स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रा. अनंत सोनवणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदीप इक्कर (जालना), मिलिंद घायवट (ठाणे), गोपाळ कांबळे (पुणे), कुशल राऊत (अकोला), अमोल घटविसावे (अहमदनगर), तुकाराम कांबळे (नांदेड), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड) यांना ‘बंधुता शब्द क्रांती’, तर प्रवीण देवरे (मुंबई), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), विनोद सावंत (पलूस), राजेश साबळे (ठाणे), मनोहर कांबळे (खेड), पल्लवी पतंगे (मुंबई), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विद्या अटक (पुणे) यांना ‘बंधुता मायमराठी’ पुरस्कराने गौरविण्यात आले.
डॉ. गिरीश गांधी म्हणाले, “चुकीच्या दिशेने वाहणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध उभे राहण्याचे धाडस असायला हवे. ज्ञानी खूप आहेत; पण क्रियाशीलता नसेल, तर त्याचा उपयोग नाही. वैचारिक क्षमता संपते तेंव्हा चारित्र्यहनन सुरू होते. समाजात अनेक प्रश्न आहेत. सर्वसामान्य माणूस न्यायापासून वंचित आहे. स्वातंत्र्याचा उजेड झोपडपट्ट्यातील प्रत्येकापर्यंत पोहचलेला नाही. समाजात बंधुता आली, तरच आपल्या बंधूंचे दुःख आपल्याला समजेल.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “कोणत्याही कार्यक्रमात भेदभाव नाही, हे बंधुता चळवळीचे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण्याशी संघर्ष आहे; ब्राह्मणाशी नाही, हे आपण समजून घ्यावे. गिरीश गांधी हे गांधीवादी, समाजवादी, मानवतावादी आहेत. बंधुतेला प्राधान्य देत ते जगले आहेत. जगातली सगळी युद्ध कायमचे संपवून माणसात माणूसपण, बंधुता रुजवली तरच समाज गुण्यागोविंदाने नांदू शकेल. सत्ता आणि सत्य एकत्र नांदू शकत नाहीत.”
प्रकाश रोकडे, “महापुरुष व महामानवांच्या विचारांची बेरीज करून त्याप्रमाणे वर्तन केल्यास आणि स्वातंत्र्य, समता बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांवर भारतीय समाजाची उभारणी केल्यास जगाच्या पाठीवर भारत बंधुत्वाची खाण असलेले तीर्थक्षेत्र होईल. लोकशाहीचे दुसरे नाव म्हणजे बंधुता, असे बाबासाहेब म्हणत. संविधान सुरक्षित असेल, तोवर भारतीय लोकशाहीला धोका नाही. विचारांना कृतीची जोड देण्याची गरज आहे.”
चंद्रकांत वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सदाशिव कांबळे यांनी आभार व्यक्त केले.