शेती उद्योगाला नावीन्यतेची, इच्छाशक्तीची जोड हवी

शेती उद्योगाला नावीन्यतेची, इच्छाशक्तीची जोड हवी

संकटाला संधी माना; हृदयातील आगीला ‘कॅपिटल’ बनवा 
प्रतापराव पवार यांचे प्रतिपादन; विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’चे आयोजन
 
पुणे: “औद्योगिक क्षेत्रात यशासाठी आर्थिक व्यवस्थापन, कल्पकता, ध्येयासक्ती, आत्मविश्वास आणि मूल्यांची जपणूक महत्वाची आहे. कृषी क्षेत्रात उद्योगांच्या अमाप संधी आहेत. मराठी माणसाने उद्योगाभिमुख मानसिकता विकसित करून त्याला नावीन्यतेची, इच्छाशक्तीची जोड देत स्वतःसह राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे,” असे प्रतिपादन मोर्डे फुड्सचे हर्षल मोर्डे यांनी केले.
 
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या शारदाबाई गोविंदराव पवार उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित समिती उद्योजक परिषद व ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी हर्षल मोर्डे बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री प्रतापराव पवार होते. सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे गजानन राजूरकर, बारामती ऍग्रोचे निलेश नलावडे, सिंधफळे ऍग्रो फ्रुटचे व्यंकट सिंधफळे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, उद्योजकता केंद्राच्या प्रमुख डॉ. ज्योती गोगटे, कार्यकर्ते हेमंत राजहंस व्यासपीठावर उपस्थित होते.
 
यावेळी समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच युवा उद्योजिका कीर्ती हासे हिला एक लाखाचे बीज भांडवल देण्यात आले. तर सुरज कुलकर्णी या युवा उद्योजकाने गेल्या वर्षी समितीकडून घेतलेले बीज भांडवल परत केले. 
 
 
हर्षल मोर्डे म्हणाले, “तुम्ही सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहात. उद्योजक होण्यासाठी आवश्यक बऱ्याच गोष्टी तुम्हाला उपजतच मिळाल्या आहेत. समितीने मार्गदर्शनासाठी व्यासपीठ दिले आहे. उद्योजक होण्यासाठी एक स्पार्क लागतो, तो कुठून येईल सांगता येत नाही. तुमच्यात तो स्पार्क आहे; त्याला जागे करून कल्पकतेने उद्योग साकारावा. अवतीभवतीच्या नैसर्गिक गोष्टींचा लाभ करून घ्यावा. जोखीम पत्करण्याची तयारी ठेवावी.”
प्रतापराव पवार म्हणाले, “यशाचे गमक म्हणजे आपल्या हृदयातील आग आहे. ती आग हृदयात असेल, तर आपण कोणतेही धेय्य साध्य करू शकतो. संकट ही संधी असते. आपल्याला उच्च दर्जावर पोहोचण्यासाठी संकटे यायलाच हवीत. उद्योग करताना आर्थिक गोष्टीचे भान, जीवनातील प्राधान्यक्रम, वेळेचे महत्व, शिस्तीचे पालन आणि प्रामाणिकपणा जपला पाहिजे. सामाजिक बांधिलकीची भावना कायम मनात जपायला हवी.”
व्यंकट सिंधफळे म्हणाले, “भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपल्याला सर्वच क्षेत्रात पुनर्विचार (री-थिंक) व पुनर्रचना (री-डिझाईन) करण्याची गरज आहे. नेहमीपेक्षा काही वेगळी कल्पना दिली, तर तुमचा व्यवसाय वैश्विक झाल्याशिवाय राहत नाही. कल्पकतेला वाव देण्यासाठी अनेक गुंतवणूकदार सज्ज आहेत.”
 
गजानन राजूरकर यांनी कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग, संशोधन व इनोव्हेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात समितीचे माजी विद्यार्थी आणि कृषी उद्योजक डॉ. संभाजी सातपुते, दिनेश शेळके, निलेश रासकर, पवन दळवी यांनी त्यांचा औद्योगिक प्रवास उलगडला. 
 
तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्य, ‘अ‍ॅग्रीबिझ कनेक्ट २०२४’च्या आयोजनामागील भूमिका विशद केली. जीवन बोधले यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत राजहंस यांनी आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *