टेकड्या, जैवविविधतेच्या संवर्धनात पुणेकरांचे योगदान
राहुल पाटील यांचे प्रतिपादन; टेकडी संवर्धन, पर्यावरण रक्षण यावर जनजागृती व प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे : “वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचनेमुळे टेकड्या पुण्याचा श्वास असून, त्या शहराच्या नैसर्गिक वैभवात भर घालतात. पुणेकरांचे आणि टेकड्यांचे जिव्हाळ्याचे नाते असून, टेकड्या आणि येथील जैवविविधतेचे संवर्धन करण्यात पुणेकर प्रेरक शक्ती म्हणून आघाडीवर असतात,” असे प्रतिपादन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या टेकडी संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे उपाय याबाबत जनजागृती व प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी राहुल पाटील बोलत होते. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने मंगळवारपर्यंत (दि. ६ जून) सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रसंगी घनकचरा विभागाच्या आयुक्त आशा राऊत, ग्रीन हिल्स ग्रुपचे संजय सूर्यवंशी, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीच्या अध्यक्षा शामला देसाई, अतुल वाघ, रूट स्किल्सच्या भाविशा बुद्धदेव, लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स व वन उद्यान संवर्धन व सेवा संस्थेचे किशोर मोहोळकर, पर्यावरण अभ्यासक कपिला सोनी आदी उपस्थित होते.
ग्रीन हिल्स ग्रुप, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी, लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स, वन उद्यान संवर्धन व सेवा संस्था, अंघोळीची गोळी, रूट स्किल्स, आनंदवन फाउंडेशन, ५१ए संस्था, वेताळ टेकडी बचाव कृती, समिती पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था, सर्व्ह विथ इम्पॅक्ट, यूएन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, डू सेव्ह फाउंडेशन, ग्रीन सनराईस हिल वाघोली या संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. मान्यवरांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल पाटील म्हणाले, “ही नैसर्गिक संपत्ती आपण भावी पिढीला सुरक्षितपणे हस्तांतरित करायला हवी. त्यासाठी माझी टेकडी समजून प्रत्येकाने त्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत टेकड्या वाचवल्या पाहिजेत. विकास हवाच आहे, परंतु निसर्गावर आघात घालून तो होता कामा नये. निसर्गाला हानी पोहोचू न देता विकासकामे व्हावीत. पर्यावरणाच्या बाबतीत पुणेकर जागरूक असून, येथे अनेक संस्था स्वयंस्फूर्तीने उल्लेखनीय काम करत आहेत.”
आशा राऊत म्हणाल्या, “स्वच्छ व सुंदर पर्यावरण ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. घनकचरा विभागांतर्गत १० ते १५ हजार कर्मचारी काम करत आहेत. लोकांचा सहभाग, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढला, तर पर्यावरण संवर्धनाचे आणखी चांगले काम होईल. पुण्यात अनेक पर्यावरणप्रेमी संस्था कार्यरत असून, त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरते.