लोकशाहीच्या रक्षणासाठी बंधुतेची मशाल हाती घ्यावी : डॉ. सबनीस

लोकशाहीच्या रक्षणासाठी बंधुतेची मशाल हाती घ्यावी : डॉ. सबनीस

बंधुता परिषदेतर्फे दहाव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनात रोहित पवार, प्रा. प्रदीप कदम यांना पुरस्कार प्रदान

पुणे, ता. १२ : धर्मांध आणि सत्यांध असलेले सत्ताधारी वैचारिक दिवाळखोरी, महापुरुषांची बदनामी, नामांतर आणि धर्मांतर यासंबंधी उलटसुलट चर्चा करण्यात मश्गुल आहेत. अखंड भारतासाठी हे हिताचे नाही. अशावेळी बंधुतेची मशाल घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी उभे ठाकले पाहीजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

क्रांतीदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय या संस्थाच्या वतीने कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात आयोजिलेल्या दहाव्या शिक्षक आणि विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी ते बोलत होते. डॉ. सबनीस यांच्या हस्ते आमदार रोहीत पवार यांना ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. संजय नगरकर, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी, ‘आम्ही भारतीय’ अस्मिता दर्शन यात्रेने संमेलनाची सुरुवात झाली. दोन हजार विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यिकांनी त्यात सहभाग घेतला. यात्रेच्या प्रारंभी सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शंकर आथरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

प्रा. शंकर आथरे म्हणाले, “कारखान्यांमध्ये वस्तूंचे उत्पादन व्हावे, तसे आजच्या शिक्षण व्यवस्थेने प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, विविध क्षेत्रातील अधिकारी यांचे उत्पादन केले. पण माणूसपण हरवले. त्यामुळे अडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीसाठी सक्षमपणे उभा राहणारा समाज निर्माण झाला नाही ही शोकांतिका आहे. त्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरतात.” अशा संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल. त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास चालना मिळेल. वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल, अशी भावना संमेलनाध्यक्ष डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार रोहित पवार, प्रा. प्रदीप कदम, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या संमेलनात बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले. राजेंद्र फाळके यांनी स्वागत केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुखदेव कोल्हे यांनी आभार मानले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *