रत्नाकर गायकवाड यांची भावना; वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ
‘सिंबायोसिस’ व सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टतर्फे वारंकाऱ्यांसाठी २४ वर्षांपासून उपक्रम
पुणे: “ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या, शिणलेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम घेऊन निःस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे आपण सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’ आहात,” अशी भावना राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी केली.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ शनिवार, दिनांक २९ जून २०१४ रोजी झाला.
यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते. पुण्यापासून जेजुरी पर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल. कविता हर्बल्स यांच्या वतीने ५० हजार बाम देण्यात आले आहेत.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, परिवहन अधिकारी अनिल वळीव, अॅड. नीलेश निकम, अक्षय साळवे, डॉ. विजय सागर, बिशप स्कूलचे प्राचार्य शाईने मॅक्फर्सन, कन्हैयालाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, “गेल्या २४ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. वारकर्यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. स्वयंशिस्त असलेल्या या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वरभक्ती असते. या उपक्रमात आपल्याला काही मदत लागली, तर पुणे महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.”
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो.”
“वारकऱ्यांच्या सेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एका अँब्युलंसपासून सुरु झाला. ही वारकरी आरोग्यसेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल, असा विश्वास देतो,” असे ऍड. अविनाश साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुधीर दरोडे यांनी आभार मानले.