पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा पांडुरंगाच्या सेवेसमान
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी भावना; फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ‘सिंबायोसिस’ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ
पुणे : “ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला गेल्या २३ वर्षांपासून मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या, शीणलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्याचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरु राहावा,” अशी भावना ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी झाला.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार, पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, ‘सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, महापालिकेचे आरोग्य प्रमुख भगवान पवार, शांतीलाल भटेवरा, ऍड. प्रतापसिंह परदेशी, अक्षय साळवे, निवेदिता एकबोटे, राधिका धिंग्रा आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो.”
कुणाल खेमनार म्हणाले, “सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. वारकरी सेवेचे हे व्रत इतरांसाठीही प्रेरक आहे. वारकऱ्यांचे दुःख हलके करण्याचे, त्यांना वारीत चालताना अडचणी येऊ नयेत, यासाठी औषधे व आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
उल्हासदादा पवार म्हणाले, “वारी हा विचार, विवेक व वैराग्य याचा त्रिवेणी संगम आहे. या संगमात चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ईश्वरभक्तीची अनुभूती देते. हे पुण्याचे काम या दोन्ही संस्था एकत्रितपणे गेली २३ वर्षे करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.”
दहा ऍम्ब्युलन्स, ५ दुचाकी देणार सेवा
“संतसेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एक अँब्युलंसपासून सुरु केला. यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून यामध्ये काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवेसाठी ही सज्ज असते. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरत वारकरी दवाखाना कार्यरत असेल. ही वारकरी आरोग्य सेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल, असा विश्वास देतो,” असे ऍड. अविनाश साळवे प्रास्ताविकात सांगितले.