पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना; कोथरूडमध्ये रंगली ‘स्वरस्वती’ सांगीतिक मैफल
पुणे : सत्यम शिवम सुंदरम… मेरे नैना सावन भादो…. ये दिल और उनकी निगाहों… अपलम चपलम… मै जिंदगी का साथ… ये आंखे देखकर… ओ मेरे शाहे खुबा… वो भुली दासता… कुछ दिलने कहा… सूर येती विरून जाती… अशा सुवर्णकाळातील अजरामर गीतांची स्वर मैफल रंगली. धुलीवंदनाच्या निमित्ताने दिवसभर रंगात न्हाऊन निघालेल्या पुणेकरांच्या आनंदात रात्री या स्वर मैफलीने सप्तरंग भरले. खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची मंचावरील उपस्थिती आणि त्यांच्या शब्दात गाण्यांच्या निर्मिती, सादरीकरणातील लतादीदींच्या आठवणींनी श्रोत्यांना सुखद अनुभूती दिली.
निमित्त होते, ‘महक’ प्रस्तुत सुवर्णकाळातील अजरामर गीतांच्या ‘स्वरस्वती’ मैफलीचे! प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत, गेट सेट गो आयोजित ‘स्वरस्वती’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रमातून कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात स्वर रंगांची उधळण झाली. ओ सजना, चंदन सा बदन, मै एक सदी से, पिया तोसे नैना, सावन का महिना अशी बहारदार आणि अजरामर गीते सादर झाली. अनेक गाण्यांनंतर श्रोत्यांनी ‘वन्स मोअर’ची मागणी करत कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला.
गायिका डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि जितेंद्र अभ्यंकर यांच्या बहारदार गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनय गाडगीळ, मिहीर भडकमकर, बाबा खान, केदार मोरे, प्रसाद गोंदकर, समीर सप्रे, विशाल थेलकर, निलेश देशपांडे अपूर्व द्रविड, ऋतुराज कोरे यांचे बहारदार वादन झाले. मिलिंद कुलकर्णी यांनी ओघवते निवेदन केले. आदरणीय पंडितजींसमोर सहभागी गायक-वादक कलाकारांनी ‘स्वरस्वती’ कार्यक्रमात ज्यापद्धतीने आणि ताकदीने सर्वच रचना सादर केल्यात, त्या म्हणजे खरेतर प्रत्यक्ष दैवी आशीर्वाद आहेत, असेच वाटले. अप्रतिम सादरीकरण ज्या मूडमध्ये कार्यक्रम सुरू होता ते ऐकतांना अंगावर शहारे येतात.
लतादीदींच्या आठवणींना उजाळा देताना पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “लतादिदी हिरकणी होती. सरस्वती, महालक्ष्मीचे रूप होती. तिच्या जाण्याने संगीतपर्व संपले असले, तरी आता संगीताचे एक नवे युग सुरु झाले आहे. आज तिची गाणी अनेक गायक गातात. वादक वाजवतात. अनेक कलाकारांच्या डोक्यावर तिचा मायेचा हात, आशीर्वाद आहे. मूळ आवाज आज नक्कीच देहरुपाने नाही. पण ज्या रचना दीदींनी गाऊन अजरामर केल्या, त्या आजही ऐकतांना छान वाटते. दिदी नावाचे पर्व संपले, पण लता मंगेशकर या नावाने जागतिक पटलावर जी कारकीर्द घडवली ती रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहणार आहे. दीदीचे कर्तृत्व महान आहे. आपल्या वडिलांची आठवण जपण्यासाठी तिने हॉटेल, सिनेमा किंवा नाट्यगृह उभारले नाही, तर आशियातील सर्वात मोठे असे ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ पुण्यात उभारले. आपल्या सर्वांसाठीच तिच्या या आठवणी कायम मनात साठवून ठेवण्याजोग्या आहेत.”