स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र; कौटुंबिक मनोरंजनाचा धमाल तडका पाहायला मिळणार
पुणे, ता. ७: स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आणि त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे, यामुळे चर्चेत असलेला बहुप्रतीक्षित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीझर, पोस्टर, प्रसारगीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून, चित्रपट निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एक आगळा अविष्कार ठरणार आहे.
‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’च्या नावापासूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. अनेक गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहेत. स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड अडकून पडतात. त्यांचा मोबाईलसुद्धा बाहेर राहिला आहे. त्यांचे नाते काय आहे, त्यांचात संबंध काय आहे, अडकण्याचे कारण काय, हे प्रश्न रसिकांना पडले असले तरी त्यातून पडद्यावर धमाल पाहायला मिळणार याची हमी मात्र त्यांना मिळाली आहे. ट्रेलर, पोस्टर यातून ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार भवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. चैत्र पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत सर्व कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांनी एकत्र येत आगळा उत्सव साजरा केला होता. आता चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहिली जात असताना कलाकारांनी चित्रपटाचे विविध पैलू पत्रकारांसमोर उलगडले. निर्माती मंजिरी ओक, अभिनेत्री रेणुका दफ्तरदार, राधा सागर आदी उपस्थित होते.
तीन दिग्गजांचे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येणे तर आहेच, पण प्रसाद ओकच्या पंचरंगी भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांना आहेत. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि गायक अशा बहुपेडी भूमिकेत प्रसाद पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यातही त्याची या चित्रपटातील भूमिका आगळी-वेगळी आहे आणि त्याने त्यातील एक गाणेही गायले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर प्रसाद ओकचा दिग्दर्शक म्हणून हा नवा चित्रपट आहे.
चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडीओजचे असून चित्रपटाची कथा व दिग्दर्शन प्रसाद ओक यांचे आहे. पटकथा व संवाद अजय कांबळे यांचे आहेत. प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, निलेश राठी हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
“आज मराठी चित्रपटसृष्टीत विविधांगी प्रयोग होत आहेत. कथेच्या बाबतीत हासुद्धा एक तसाच प्रयोग आहे. ही अगली कथा प्रेक्षकांना आनंद देवून जाईल,” असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले. स्वप्नील जोशी म्हणाला, “हा चित्रपट निखळ करमणुकीची हमी देतो. टीझर, ट्रेलर पाहिल्यावर हे मनोमन पटल्याशिवाय राहत नाही. माझी आणि सोनाली कुलकर्णी यांची अगली केमिस्ट्री आणि प्रसादचे दिग्दर्शन हा बेत फक्कड जमून आला आहे.”
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “अभिनयाचा कस लावणाऱ्या आणि बुद्धीला चालना देणाऱ्या भूमिका करायला मला आवडत. “सुशीला-सुजीत”माझी भूमिका तशीच आहे. स्वप्नील आणि प्रसादबरोबर पहिल्यांदाच काम करत होते, त्यामुळे हएक्साईटमेंट होतीच. प्रत्यक्षात काम करताना खूपच धमाल आली. कथा, संकल्पना, संवाद त्यांनी निर्मितीमुल्ये या सर्वच बाबतीत चित्रपट वेगळा आहे. मला पूर्ण खात्री आहे, प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.”