डॉ. अपूर्वा पालकर यांचे मत; सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये त्रैमासिक स्टार्टअप फेस्टिवलमधून नवउद्योजकांना प्रोत्साहन
—————————— —————————— —————————— —–
अभिनवता, कल्पकता हे नवनिर्मितीचे घटक
डॉ. दीपक शिकारपूर यांचे मत; ‘सूर्यदत्ता’मध्ये त्रैमासिक स् टार्टअप फेस्टिवल
—————————— —————————— —————————— —–
‘स्टार्टअप फेस्ट’मधून विद्यार्थ्यांतील उद्यमशीलतेला प्रोत्साहन
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्ता’मध्ये त्रैमासिक स् टार्टअप फेस्टिवलचे आयोजन
—————————— —————————— —————————— —–
ग्राहकाभिमुख, नाविन्यपूर्ण स्टार्टअप काळाची गरज
डॉ. दीपक तोष्णीवाल यांचे मत; ‘सूर्यदत्ता’मध्ये त्रैमासि क स्टार्टअप फेस्टिवलचे आयोजन
पुणे : “नवनवीन उद्योगाच्या उभारणीतूनच भारत आत्मनिर्भर होईल. इनोव्हेशन, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून केंद्र सरकार उद्योगांसाठी पूरक यंत्रणा उभारत आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक, उद्यमशील वृत्ती जोपासावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ‘सूर्यदत्ता’चा पुढाकार स्तुत्य आहे. सूर्यदत्ता संस्थेतून अनेक उद्योजक घडतील,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात सुरु केलेल्या ५० स्टार्टअपचे त्रैमासिक फेस्टिवल नुकतेच बावधन कॅम्पसमध्ये झाले. यावेळी डॉ. पालकर बोलत होत्या. प्रसंगी आयटीतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सार डिस्ट्रिब्युशन हाऊसचे कार्यकारी संचालक स्वरूप मुलचंदानी, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, रॅमरत्न इन्फ्रास्ट्रक्चरचे कार्यकारी संचालक अली रेझा देहाक्वानपोर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
स्टार्टअप फेस्टिव्हलमध्ये प्रथम क्रमांक कॉमर्स शाखेतील मिहिर गणेशवाडेच्या ‘इलेव्हन डिझाईन : कप बिन’ स्टार्टअपला, द्वितीय क्रमांक ‘पीआयएटी’मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सतीश झेंडेच्या ‘तन्वी ड्रीम्स’ स्टार्टअपला, तर तृतीय क्रमांक ‘एसआयएमएमसी’मध्ये पीजीडीएमच्या मयूर आतकरी याच्या ‘थर्ड बाईट’ (फूड प्रोसेसिंग) या स्टार्टअपला मिळाला. विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, सात हजार आणि पाच हजार रोख व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व सहभागी स्टार्टअपना प्रमाणपत्र व रोख एक हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “एकविसाव्या शतकात अभिनवता आणि कल्पकता हे नवनिर्मितीचे, भांडवलाचे घटक आहेत. वयाची अट नसल्यामुळे अनेक युवा उद्योजक भारतात तयार होत आहेत. सूर्यदत्ता समूहाने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. शैक्षणिक संस्थांनी अभ्यासक्रमाबरोबरच असे उपक्रम राबविले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही या संधीचा फायदा घेतला ही चांगली गोष्ट आहे.”
स्वरूप मुलचंदानी म्हणाले, “मुलांमध्ये चांगले उद्योजक होण्यासाठी दृष्टी आणि ध्येय आहे. नवीन पिढीकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहेत. त्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देऊन उद्योगामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य दिले पाहिजे. यासाठी स्वतःच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन प्रयत्न करायला हवेत. तुमचे स्टार्टअप जागतिक पातळीवर देखील जाऊ शकतात.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. यशापयशाचा विचार न करता नवीन कल्पना मांडून त्यावर काम करावे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करत राहावे. कमीत कमी खर्च करून आपले उत्पादन कसे तयार करता येईल, यावर विचार करावा.”
डॉ. दीपक तोष्णीवाल म्हणाले, “ग्राहकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप सुरु व्हावेत. भविष्याचा विचार करून उत्पादनाची निर्मिती केली पाहिजे. त्याचे दूरगामी नियोजन करावे. मार्केटिंगसह आपला ग्राहक विस्तारण्यावर भर द्यावा. उत्पादनाचे पेटंट करून घ्यावे. स्टार्टअपसाठी सरकारच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. डिजिटल माध्यमे, योग्य व्यक्ती आणि संस्था यांच्याशी संपर्क वाढवावा”
———————
असे आहेत ५० स्टार्टअप्स
सूर्यदत्ता ग्रुपच्या कॉमर्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाईन अशा विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी एकूण ५० स्टार्टअप सुरु केले आहेत. त्यामध्ये इलेव्हन डिझाइन्स कप बिन, कॅन्व्हा फूड टूर, निओहीट, सुपर हायजेनिक, स्टॉक मार्केट स्काल्पर, द सोशाज क्रिएशन्स, सुशांत गृह उद्योग, टेकी गाईड, सर्वज्ञ मेहेंदी आर्ट, किचन वेस्ट श्रेडर, टेलरव्हिजिट, राधेय हर्बल्स, हॅण्डमेड ज्वेलरी, मैत्री कस्टमाइज प्रिंट, सरकाळे प्रा. ली., डेअरी फार्म, दास कॅफे, अर्ब कार्ट, हार्डवेअर शॉप, कोलशेड, द येलो बटरफ्लाय स्टुडिओ, युनिक आर्टस्, डिझायर इंटिरियर्स, तन्वी ड्रीम्स, इंटिरियर डिझाईन, आर्किटेक्ट डिझाईन स्टुडिओ, लाईटलाईन डिझाईन स्टुडिओ, स्पेक्टरीयर डिझाईन, इंटिरिअर कॉस्ट, होम फर्निशिंग, थ्रीडी प्रिंटर बाय असेम्बलिंग पार्टस, क्लाउड किचन, थिम रेस्टोरंट, गॅम्बलिंग स्पोर्ट्स बार, तन्वी एंटरप्रायझेस, बेकरी फूड ट्रक, वन डे जॉब्स (ओडीजी), पबजी पिज्जा, ओकेसी इंडिया, आरसा वर्धित, नीडलीस, ऍडप्टिव्ह क्लोदिंग, तन्मया, हॅण्डमेड कस्टमाइज प्रॉडक्ट, गारमेंट कंस्ट्रक्शन्स, मॅकरेम व्हेविंग, कस्टमाइज गारमेंट, फॅशन ग्लान्स आदी स्टार्टअपचा समावेश आहे.