प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्रारंभी ३०० विद्यार्थ्यांकडून वैश्विक शांततेसाठी मानवतावादी उपक्रम

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्रारंभी ३०० विद्यार्थ्यांकडून वैश्विक शांततेसाठी मानवतावादी उपक्रम

पुणे: नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सूर्यदत्त नॅशनल स्कूलमधील ३०० विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन वैश्विक पातळीवर एक महत्त्वपूर्ण व मानवतावादी उपक्रम हाती घेतला आहे. वैश्विक स्तरावर वाढत्या संघर्षांविषयीची जाणीव, तसेच सामाजिक बांधिलकीची तीव्र भावना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सामूहिक निवेदन तयार करून भारताच्या पंतप्रधानांना सादर केले आहे. पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन हा संघर्ष थांबविण्यात भूमिका बजवावी, तसेच वैश्विक शांतता, संवाद व समन्वय प्रस्थापित करावा, अशी विनवणी निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय तत्त्वज्ञानाच्या समृद्ध परंपरेतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीचा आधार घेत.‘ अहिंसा’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्यांवर आधारित भारतीय संस्कृती जगासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरू शकते, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. या निवेदनामध्ये युद्धाच्या मानवी परिणामांवर विशेषत्वाने प्रकाश टाकण्यात आला आहे. राजकीय व सामरिक पातळीवरील संघर्षांचे परिणाम केवळ सीमांपुरते मर्यादित न राहता त्याचा सर्वाधिक फटका निरपराध नागरिकांना, विशेषतः बालकांना सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले.

वैश्विक शांततेच्या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी विद्यार्थ्यांनी सात कलमी धोरणात्मक आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रे व नाटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांद्वारे सुमारे २०० देशांचा सहभाग असलेले पारदर्शक व स्वेच्छिक ‘जागतिक शांतता मतदान’ राबविणे, भारताने तटस्थ व विश्वासार्ह मध्यस्थ म्हणून नेतृत्व करणे, संघर्षग्रस्त राष्ट्रांनी तात्काळ व विनाशर्त शस्त्रसंधी जाहीर करणे, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुरक्षित व नियोजित सैन्य माघार घेणे, अण्वस्त्रांच्या वापरावर कठोर जागतिक बंदी घालणे, युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या संसाधनांचे शिक्षण, आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी पुनर्विनियोजन करणे तसेच मानवजीवन व मूलभूत सुविधांचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्याने करणे यांचा समावेश आहे.

या उपक्रमाचे कौतुक करताना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील या मानवतावादी विचाराचे कौतुक केले पाहिजे. शिक्षण केवळ बौद्धिक विकासापुरते मर्यादित नसून, ते संवेदनशीलता, संशोधन व चिकित्सक वृत्ती, मूल्यनिष्ठा व धैर्य घडविणारे असते. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमधून वैश्विक शांततेसाठी एक सक्षम व आशादायी दिशा स्पष्टपणे दिसून येत आहे. हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक नसून, वैश्विक ऐक्य, जबाबदार नेतृत्व व शांततापूर्ण सहअस्तित्व या मूल्यांप्रती विद्यार्थ्यांची असलेली बांधिलकी अधोरेखित करतो.”

“द्वेषावर प्रेमाचा विजय व्हावा, संघर्षांऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला जावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. या प्रक्रियेत भारताने नेतृत्व करावे, हीच आमची अपेक्षा आहे,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय बी. चोरडिया यांच्या कल्पनेतून, तसेच ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्राचार्या, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.