पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, मराठी स्वाक्षरी स्पर्धा, तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली.
प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती, तसेच मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयात विविध कार्यक्रम आयोजिले होते. ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रशांत पितालिया, प्रा. धनंजय अवसरीकर, प्राचार्य डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य डॉ. सीमी रेठेरेकर, उपप्राचार्य दीपक सिंग, विभाग प्रमुख अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रशांत पितालिया यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. ते म्हणाले, “आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. इंग्रजी भाषा येत नाही, याचा न्यूनगंड बाळगू नये. आपल्या बोली भाषेतील शब्दांनी भाषा समृद्ध होते. शुद्ध मराठी भाषा येत नसल्याचे भय न बाळगता आपल्या भाषेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक शब्द शिकण्याची संधी शोधून शब्दसंग्रह वाढवावा. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केल्यानेच भाषा विकसित होईल. काळाची गरज ओळखून अन्य भाषा शिकण्यासही प्राधान्य द्यावे.”
वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवनाथ काशीद, गायत्री राजगुरू, यश मंडल, सत्यजित दाभाडे यांनी यश प्राप्त केले. मराठी स्वाक्षरी स्पर्धेत विशाखा साळुंके, गायत्री राजगुरू, ईश्वरी देव या विद्यार्थ्यांची स्वाक्षरी सर्वोत्कृष्ट ठरली. इंग्रजी शब्दाला मराठी शब्द सुचविण्याची आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रणिता गांधी, पूजा भुजबळ, तृप्ती लासरेकर, विद्या जोशी या ग्रंथालय सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन ईश्वरी देव या विद्यर्थिनीने केले.
मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिचा सन्मान करण्याचे दायित्व आपल्यावर असून, दैनंदिनी व्यवहारात मराठीचा अधिकाधिक उपयोग आपण सर्वानी केला पाहिजे. सूर्यदत्त संस्थेमध्ये नेहमीच मराठी भाषेतून संवादाला प्रोत्साहन दिले जाते. तसेच विविध कार्यक्रम, स्पर्धा यातून मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली जाते.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स