स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठी सूर्यदत्त संस्था करणार कायमस्वरूपी मार्गदर्शन

स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठी सूर्यदत्त संस्था करणार कायमस्वरूपी मार्गदर्शन

‘सूर्यदत्त सेंटर फॉर इन्क्यूबेटिंग स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भर भारत’ची स्थापना

पुणे, ता. २२ : “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर स्टार्टअप्स यशस्वी व्हायला हवेत. त्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या बरोबरीने विविध समस्यांची सोडवणूक आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम मानसिकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे सूक्ष्म नियोजन, सकारात्मक व धोरणी मानसिकता, पर्यायी मार्गांचा अवलंब करा,” असा सल्ला इंटरनेशनल सक्सेस कोच व माइंड पावर एक्सपर्ट सुनील पारेख, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिला. शिक्षण, उद्योग, सामाजिक, आरोग्य आदी क्षेत्रांतील ४० वर्षांचा अनुभव असलेल्या प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउडेशनच्या सूर्यदत्त इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशीप सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे (एसआयआयसीई) ‘आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्टअप्स आणि यशस्वी स्टार्टअपसाठी सकारात्मक व धोरणी मानसिकता’ या विषयावर योजित कार्यक्रमात सुनील पारेख व प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. प्रसंगी सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल आदी उपस्थित होते. ‘सूर्यदत्त सेंटर फॉर इन्क्यूबेटिंग स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भर भारत’ची स्थापना केली असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तसेच या केंद्राच्या मार्फत नियमितपणे प्रत्येक महिन्याला स्टार्टअप्स विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजिला जाणार आहे.
 
सुनील पारेख यांनी सांगितले की, नवीन उद्योग अथवा व्यवसाय सुरू करताना आवश्यक गोष्टी उपलब्ध असल्या, तरी नव्याने निर्माण होणार्‍या आव्हानाना सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि सकारात्मक मानसिकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध अडचणीवर मात करणे शक्य होणार आहे. कारण यशस्वी होण्याचा हा एक मार्ग आहे. या बरोबरच नवनवीन संकल्पना, आवश्यक त्या उपाययोजना करणे यावर भर देण्याची गरज आहे. यासाठी मानसिक व्यवस्थापनाची गरजेचे असते. कामाची दिशा नक्की असणे आणि मनात कोणतीही भीती नसणे गरजेचे आहे. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दि. २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मनाचे व्यवस्थापन व सकारात्मक दृष्टीकोन यावर विशेष सत्र आयोजिले आहे. यामध्ये अवघड स्थितीत कसे काम करता येईल आणि परिस्थितीवर नियंत्रण कसे आणता येईल, याची माहिती दिली जाणार आहे. हे सत्र ऑनलाइन वर्ग रोज सकाळी सहा ते सात या वेळेत होणार आहे.”
 
याविषयी अधिक माहिती सांगताना डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “गेल्या काही वर्षात स्टार्टअप हा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याचे यश आणि अपयश यावर देखील चर्चा होत असते. नवे बदल, नवी आव्हाने येत आहेत. विविध क्षेत्रात स्टार्टअप पाहावयास मिळत आहेत. यासाठी काम करण्याची इच्छा, क्षमता, आणि कष्ट करण्याची तयारी असायला हवी. तसेच या क्षेत्रातील अडचणी, प्रश्न यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामागची करणे शोधली पाहिजेत आणि त्यावर व्यापक उपाययोजना करायला हवी. तरच अपयशाचे प्रमाण कमी होणार आहे. या क्षेत्रात होत असणार्‍या आर्थिक गुंतवणुकीचा विनियोग अधिक चांगल्या प्रकारे कसा होईल, हे तपासण्याची गरज आहे. त्यासाठी दक्षता घेतली पाहिजे. यासाठी संस्थेत ‘सूर्यदत्त सेंटर फॉर इन्क्यूबेटिंग स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भर भारत’ हे नव्याने केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याठिकाणी प्रत्येक महिन्यात कार्यक्रम घेऊन स्टार्टअपच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.”
 
“सूर्यदत्त शिक्षण संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून सर्वांगीण विकासाचे रोजगाराभिमुख, उद्यमशील शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. सूर्यदत्त संस्थेतील अनेक विद्यार्थी आज यशस्वीपणे व्यवसाय चालवत आहेत. तरुणांना उद्योगांसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या स्टार्टअपना यशस्वी उद्योगांत रूपांतर करण्यासाठी हे केंद्र व सुनील पारेख यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला गती व दिशा देण्याचे काम ‘सूर्यदत्त’च्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, यशस्वी स्टार्टअप उभारणाऱ्या व प्रयत्न केलेल्या व्यक्तींना बोलावून मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना सूर्यदत्तमध्ये स्टार्टअप्सचे धडे दिले जाणार आहेत,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी यावेळी सांगितले.
—————
यशस्वी स्टार्टअपसाठी काही टिप्स
– नाविन्यपूर्ण कल्पनांना विकसित करण्याची तयारी ठेवावी
– सशक्त व सकारात्मक मानसिकता असायला हवी
– प्रामाणिक कष्टाची तयारी, सूक्ष्म नियोजन, नैतिकता हवी
– इतरांशी तुलना न करता आत्मपरिसक्षण करून निर्णय घ्यावा
– तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अधिक गुंतवणुकीला प्राधान्य देऊ नये
– प्रायोगिक तत्वावर सुरुवात करून मग त्याला व्यापक करावे
– संशोधन व विकास विभाग करून सखोल ज्ञान घ्यावे
– विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप करण्याची संधी आहे
– आपण मार्केटचा अभ्यास करून त्याची निवड करावी
– गुंतवणूक, कर्ज याचा अचूक अभ्यास असावा
– कायदेशीर मान्यता, पारदर्शकता व स्पष्टता ठेवावी 
– स्पर्धात्मक माहिती घ्यावी, प्रकल्प अहवाल बनवून त्याप्रमाणे काम करावे
– आर्थिक परीक्षण व स्टार्टअपच्या कामाचे अवलोकन नियमित करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *