सुलतान्स ऑफ सिंधला पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद

सुलतान्स ऑफ सिंधला पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद

महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी; सिंधी तरुणांकडून सामाजिक भान जपत एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन

पुणे : सुलतान्स ऑफ सिंधने हेमू कलानी ग्लॅडिएटर्सचा १० गडी राखून पराभव करत पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा धीरज मनवानी सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. नाणेफेक जिंकून हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा हा सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.
 
हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने पहिल्या डावात ९ षटकात ४ गडी गमावत ५५ धावा करून सुलतान्स ऑफ सिंधला ४९ धावांवर रोखत अवघ्या ६ धावांची आघाडी घेतली. हेमू कलानी ग्लॅडिएटर्स दुसऱ्या डावातही फारसा प्रभावी खेळ करू शकले नाहीत. ९ षटकांत ८ बाद ४४ धावा करत ५० धावांचे आव्हान उभारले. पहिल्या डावात अंकुश आहुजाच्या २४ धावा वगळता इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. दोन्ही डावांत मिळून हानिशने ४० धावांत ३, अमितने २० धावांत ३, तर धीरज मनवानीने २२ धावांत २ गडी बाद केले.
 
पहिल्या डावात ४९ धावा करून पिछाडीवर असलेल्या सुलतान्स ऑफ सिंधसमोर विजयासाठी ५० धावांचे लक्ष्य होते. विजयी निर्धाराने मैदानात उतरलेल्या सुलतान्स ऑफ सिंधने आक्रमक खेळ केला. पहिल्या डावात सलामीवीर सनी सुखेजा (२४) व धीरज मनवानी (१९) यांनी दुसऱ्या डावातही अनुक्रमे १३ व नाबाद १३ धावा केल्या. डब्बू आसवानी (१५) व कर्णधार अमित (६) यांनी सुलतान्स ऑफ सिंधला विजय मिळवून दिला. यतीन मंगवानीने ३२ धावांत २, तर पवन पंजाबीने २० धावांत २ गडी बाद केले. 
 
सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन, सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संस्थेला दीड लाख, तर आळंदी येथील अंध मुलींच्या शाळेला ५० हजारांची देणगी देण्यात आल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले.
 
 
महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी
सिंधी प्रीमिअर लीगमध्ये यंदा पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा घेण्यात आली. सहा संघांचा यात समावेश होता. गंगा वॉरियर्स आणि झेलम क्वीन्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानीच्या धडाकेबाज ३४ चेंडूतील ९५ धावांची खेळी व चार धावांत ३ गडी बाद करत केलेली भेदक गोलंदाजी याच्या जोरावर झेलम क्वीन्सवर ४८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत वॉरियर्सने ८ षटकांत ४ बाद ११४ धावा केल्या. ११५ धावांचे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झेलम क्वीन्सने चांगली सुरुवात केली. मात्र, सलामीवीर अंजली आसवानी (१२) जायबंदी झाल्याने, तसेच नेहा (१८) व याकृत (२४) फटके मारण्याच्या नादात लवकर बाद झाल्याने त्यांचा डाव गडगडला. अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने ७.४ षटकांत अवघ्या ६६ धावांत झेलम क्वीन्सचा डाव संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला. 
 
 
संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)

हेमू कलानी ग्लॅडिएटर्स : पहिला डाव – ४ बाद ५५ (अंकुश अहुजा २४, यतीन मंगवानी ८, अमित ८-२), सुलतान्स ऑफ सिंध : पहिला डाव – ७ बाद ४९ (सनी सुखेजा २४, धीरज मनवानी नाबाद १९, पवन पंजाबी १२-२, यतीन मंगवानी १९-१, नरेंद्र लुंड १०-१) 

हेमू कलानी ग्लॅडिएटर्स : दुसरा डाव – ८.५ षटकांत सर्वबाद ४४ पराभूत विरुद्ध सुलतान्स ऑफ सिंध : दुसरा डाव – ७.५ षटकांत २ बाद ५२ (डब्बू आसवानी १५, सनी सुखेजा १३, धीरज मनवानी नाबाद १३, यतीन मंगवानी १३-१, मनीष कटारिया २२-१)
————————–
संक्षिप्त धावफलक : (महिला गट)
गंगा वॉरियर्स – ८ षटकांत ४ बाद ११४ (शीतल आसवानी ९५, नेहा १५-२) विजयी झेलम क्वीन्स : ७.४ षटकांत सर्वबाद ६६ (याकृत २४, नेहा १४, अंजली आसवानी १२, शीतल आसवानी ४-३, सम्या ५-२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *