मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन; सुदर्शन केमिकलतर्फे रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन; सुदर्शन केमिकलतर्फे रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलामुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचा ‘सुधा सितारा’ हा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. यातून रायगड जिल्ह्यातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होण्यास नवसंजीवनी मिळेल,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रोह्याच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सुयश सिंह, सुदर्शन केमिकल्सच्या ग्लोबल पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका राजे, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.

अदिती तटकरे म्हणाल्या, “सुदर्शन कंपनी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या सहा वर्षात जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला आहे. गुणवत्तेवर आधारित हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांतील गुणवत्ता हेरून त्यांना अर्थसहाय्य व प्रोत्साहनपर मार्गदर्शन देण्याची ही कल्पना विलक्षण आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याला जातोय, याचा आनंद आहे. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढेल.”

“करिअर निवडताना इतरांपेक्षा आपल्याला कशामध्ये आवड आहे, याचा विचार करून पुढील शिक्षणाचे निर्णय घ्यावेत. कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टीकोन, प्रामाणिक प्रयत्न आणि आत्मविश्वास अंगी बाळगण्याची गरज आहे. आई-वडील व कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करावे,” असेही त्यांनी नमूद केले.

आंचल दलाल म्हणाल्या, “प्रशासकीय क्षेत्रात करिअर निवडताना त्याचा बारकाईने अभ्यास करावा. सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला मिळालेली ही एक ऊर्जा आहे. जिद्द, संयम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी तुम्हाला यशस्वी बनवत असते. सतत शिकत राहा, स्वतःला अपग्रेड करत राहा.”

वनश्री शेडगे म्हणाल्या, “आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्याने नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकले. समाजाशी आपण स्वतःला कायम जोडून ठेवले पाहिजे. आपल्या हातून समाजाची, देशाची सेवा व्हावी, लोकांचे कल्याण व्हावे, या ध्यासाने कार्यरत राहावे. सुदर्शन केमिकलसारख्या कंपन्या आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे एकाग्र व ध्येयासक्त भावनेतून यशाकडे वाटचाल करावी.”

व्हिडीओ संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना राजेश राठी म्हणाले, “सुदर्शन एक परिवार म्हणून गेली सात दशके काम करत आहे. सुधा सीएसआर अंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती उपक्रमात माझे सहकारी उत्स्फूर्तपणे सहभागी होताहेत, हे आनांदायक आहे.”

शिवालिका राजे यांनी सांगितले की, सुदर्शन कंपनीत ‘डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन’ अंतर्गत उपक्रम राबवले जात आहेत. आपण समाजातही हेच मूल्य रुजवत आहोत. यावेळी सुधा सीएसआर उपक्रमांतर्गत, मुलींप्रमाणेच मुलांना आणि दिव्यांगांना दत्तक घेऊन मदत केली जात आहे. या वर्षीच्या सुधा सितारा उपक्रमाची व्याप्ती संपूर्ण रायगड जिल्ह्यात झाली, याचा आनंद आहे.

प्रास्ताविकात माधुरी सणस म्हणाल्या, “सामाजिक जाणिवेतून २०२० मध्ये या उपक्रमाला सुरुवात केली. गेल्या सहा वर्षात जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना सुधा सितारा शिष्यवृत्ती दिली आहे. गरजू मुलामुलींना शिक्षण आणि मेंटॉरशिप देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सुदर्शन केमिकल्समधील कर्मचार्‍यांनी या मुलामुलींचे पालकत्व स्वीकारले आहे.”

विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

महिला व बालकांना ग्रामस्नेही बनविणाऱ्या ‘आदिशक्ती’, जीवनकौशल्यांचे ज्ञान देणाऱ्या ‘सु-उमेद’ या माहितीपुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. रवी दिघे यांनी आभार मानले.