लांडर गावातील युवकांसाठी उभारला फुटवेअर निर्मिती प्रकल्प; विशेष प्रशिक्षणही देणार
पुणे : उद्योग विस्ताराबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेली सुदर्शन केमिकल इंडस्ट्रिज लिमिटेड ही कंपनी आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी कायम प्रयत्नशील राहिलेली आहे. कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागामार्फत पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, उपजीविका साधन निर्मिती याअंतर्गत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत वाशी हद्दीतील मौजे लांडर येथे युवकांसाठी ‘फुटवेअर निर्मिती प्रकल्प’ स्थापित करण्यात आला आहे. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन झाले.
याप्रसंगी बोलताना विवेक गर्ग म्हणाले, “सुदर्शन कंपनी कायमच स्थानिकांच्या रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध राहिली आहे. कंपनी नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमधून आपली सामाजिक बांधिलकी जपत असते. या प्रकल्पातून लांडर येथील युवकांसाठी उपजीविकेचे एक साधन तयार झाले आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा या युवकांनी फायदा घ्यावा.” यावेळी कंपनीच्या सीएसआर हेड माधुरी सणस यांनी सुदर्शन कंपनी राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच रोहा परिसरातील ग्रामीण भागाचा शाश्वत विकास साधण्यासाठी सुदर्शन कंपनी विशेष प्रयत्न करीत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी सुदर्शनमार्फत येथील युवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकल्पासाठी लांडर येथे कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली आणि त्यामध्ये आवश्यक मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी कर्वे समाज सेवा संस्था, पुणे यांच्यामार्फत विशेष प्रयत्न घेतले जात आहेत. या उदघाटन प्रसंगी श्री.गर्ग साहेब यांच्या हस्ते लांडर येथे वृक्षारोपण देखील करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.यावेळी वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरविंद मगर, सुदर्शन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी ऍड. विशाल घोरपडे, सीएसआर विभागाचे रुपेश मारबते, वाशी गावाचे माजी सरपंच सतीश भगत,सदस्या सौ. दिपाली धामणसे, सौ.विमल भगत, लक्ष्मण जंगम पोलीस पाटील,राजु घार्गे प्रकल्प समन्वयक आणि सर्व कर्मचारी कर्वे समाज सेवा संस्था, पुणे तसेच ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ हजर होते.