ऑर्नेलास हायस्कुलच्या १९७५ च्या तुकडीची ५० वर्षानंतर पुन्हा वाजली घंटा
पुणे: साठीपार विद्यार्थी गणवेशात बसलेले, वर्गातील दोस्तांसोबतचा खट्याळपणा, मराठी-हिंदीच्या बाईंनी घेतलेला तास अन शिकवलेली कविता, आपल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा ऐकताना पाणावलेले शिक्षकांचे डोळे, एकमेकांची आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस, शाळेत असताना केलेली धम्माल मस्ती आठवून हास्यकल्लोळात बुडालेले सर्वजण… अशा हृदयस्पर्शी वातावरणात पुन्हा एकदा शाळा भरली. नाना पेठेतील ऑर्नेलास हायस्कुलच्या १९७५ च्या तुकडीची ५० वर्षानंतर पुन्हा एकदा घंटा वाजली. आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर होऊन निवृत्तीचे जीवन जगणारी ही मंडळी शाळेतून बाहेर पडलेल्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एकत्र आली. एकमेकांच्या मैत्रीचे बंध जपत, आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी स्मृतींना उजाळा दिला.
शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक फादर फॉन्सेका यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक फादर गॉडविन सालदान्हा, शिक्षक तेलोरे सर, निवृत्त शिक्षिका मेरलिन जेकब, विन्सी डिलिमा, उषा पारेख, प्रियंवदा सक्सेना या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते. दहावी-अकरावीचे जवळपास ६५ विद्यार्थ्यांनी मेळाव्याला हजेरी लावली. मुले कितीही मोठी झाली, तरी शिक्षकांसाठी ते कायमच विद्यार्थी असतात. मुलांमधील खोडकरपणा आजही आठवतो. आज तुम्हा सर्वांना यशस्वी झाल्याचे पाहून तुम्हाला घडवताना घेतलेली मेहनत यशस्वी झाली, याचा आम्हाला आनंद वाटतो, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. राजेंद्र नायडू व ईवर्ट डिसुझा यांनी सूत्रसंचालन केले. अल्ताफ चिकोडी यांनी आभार मानले.
फादर गोडवीन सलढाना यांनी ५० वर्षांपूर्वीच्या या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात खूप नाव कमावले आहे. शाळेच्या शेवटच्या दिवसाला ५० वर्षे झाली, त्याच दिवशी पुन्हा तुम्ही शाळेत येऊन तो दिवस जगत आहात, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा महत्वाची भूमिका बजावत असते. आपली जडणघडण इथूनच होते. विद्यार्थी पुन्हा शाळेत येतात, शिक्षकांशी आपुलकीने बोलतात, शाळेचे नाव उंचावतात, तेव्हा शाळेचा उर अभिमानाने भरून येतो. माजी विद्यार्थी म्हणून आपण यापुढेही सतत शाळेत यावे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक योगदान द्यावे. माजी विद्यार्थी हा शाळेचा आधारस्तंभ व्हायला हवा, असे सालदान्हा यांनी नमूद केले. १९७५ या साली दहावी, अकरावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचे वर्ग ५० वर्षांनी एकत्र येत शाळेच्या आठवणी जागवत एकमेकांच्या भेटीत रमले, हा सगळ्यांसाठी एक दुर्मिळ संगम होता.