फार्मा क्षेत्रातील स्टार्टअप व संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार

फार्मा क्षेत्रातील स्टार्टअप व संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ‘एससीपीएचआर’च्या वतीने पहिल्या ‘सूर्यदत्त ग्लोबल फार्माकॉन-२०२३’चे आयोजन
 
पुणे : “फार्मासिस्ट हा समाजासाठी पर्यायी डॉक्टर असतो. लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी फार्मास्युटिकल आणि फार्मासिस्ट समुदायाने प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजाचे आरोग्य सदृढ ठेवण्यात फार्मासिस्ट मोलाचे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन जेनरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे यांनी केले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने सुरु झालेल्या या फार्मसी महाविद्यालयातून फार्मा क्षेत्रासाठी उपयुक्त व कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चचे (एससीपीएचआर) उद्घाटन व ‘एससीपीएचआर’ आयोजित ‘सूर्यदत्त ग्लोबल फार्माकॉन २०२३’चे उद्घाटन अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी झाले. बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोकाटे होते. प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, फार्मा उद्योजक डेलकॉन्स कन्सल्टंट बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील, सहायक पोलीस आयुक्त महेशकुमार सरतापे, अभिनेता शरद सांकला, प्रा. हेमंत जैन आदी उपस्थित होते. 
 
यावेळी अर्जुन देशपांडे यांना फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सूर्यदत्त धन्वंतरी ग्लोबल आयकॉन अवॉर्ड-२०२३’ पुरस्कार देऊन, तर डॉ. चंद्रकांत कोकाटे, शरद सांकला, महेशकुमार सरतापे, बाळ कुलकर्णी, प्रसन्न पाटील यांना ‘सूर्यदत्त सूर्यभारत सूर्यगौरव ग्लोबल सन्मान-२०२३’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फार्मा क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
अर्जुन देशपांडे म्हणाले, “कोरोनाच्या काळात डॉक्टर आणि फार्मासिस्ट फ्रंटलाईनवर काम करत होते. ग्रामीण भागातही जिथे डॉक्टरांची कमतरता भासते, तिथे फार्मासिस्ट मदतीला येतो. फार्मा क्षेत्रात उद्योगांच्या मोठ्या संधी आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हायला हवीत, यासाठी जेनेरिक आधारची सुरुवात केली. आज देशभरातील करोडो लोकांना ही सेवा पुरवत असून, आठ हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार दिला आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर भर द्यायला हवा.”
 
डॉ. चंद्रकांत कोकाटे म्हणाले, “फार्मा उद्योगाच्या आयात-निर्यातमध्ये भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या फार्मा उद्योगासाठी दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरु होत असलेल्या सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च महाविद्यालयाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. येत्या काळात फार्मसी व्यावसायिकांचा गरजा पूर्ण करण्याचा सूर्यदत्त प्रयत्न करेल. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची दूरदृष्टी, विद्यार्थ्यांना दिले जाणारे सर्वांगीण विकासाचे शिक्षण आणि तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन यामुळे उत्तम फार्मास्युटिकल्स आणि फार्मासिस्ट तयार होतील, असा विश्वास आहे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अर्जुन देशपांडे यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या १६ व्या वर्षी जेनेरिक आधार हा फार्मा उद्योग सुरु करून स्वस्तात औषधे देतानाच मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही देखील या कॉलेजमध्ये संशोधन, इंनोव्हेशन आणि उद्योग निर्मितीला प्राधान्य देणार आहोत. त्यासाठी इन्क्युबेशन सेंटर सुरु करणार असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत. यामध्ये अर्जुन देशपांडे, डॉ. कोकाटे यांचे महत्वाचे सहकार्य असणार आहे.”
 
“संस्थांतील सहकार्य व समन्वय अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘फार्माकॉन’चे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये फार्मा उद्योगातील तज्ज्ञ, उद्योजक, फार्माचे विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी होतील. ‘फार्मसी उद्योगातील नामवंत व्यक्तींशी संवाद, अत्याधुनिक सोयीसुविधांची उभारणी, औषध निर्माणाचे प्रात्यक्षिक इथे अनुभवा येणार आहे. फार्मसी क्षेत्रात करिअर करणाऱ्या इच्छुकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चचा प्रयत्न आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *