जवानांकडून प्रत्येकाने शिस्त, प्रामाणिकपणा व देशप्रेम आत्मसात करावे: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन
पुणे: राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्यु-सोशियो हेल्थ कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीला (एनडीए) भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी व त्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते.
सूर्यदत्त नॅशनल स्कुलचे ५०, तर फिजियोथेरपीच्या प्रथम व तृतीय वर्षातील १०० विद्यार्थ्यांनी ‘एनडीए’ला भेट देऊन येथील प्रशिक्षणार्थी लष्करी अधिकारी व जवानांशी संवाद साधला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्राचार्य डॉ. सीमी रेठरेकर व सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका शीला ओका यांच्या पुढाकारातून या भेटीचे आयोजन केले होते.
कर्नल नायर सभागृहात कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजयकुमार यांच्या कारगिल युद्धातील आठवणींना उजाळा दिला. कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या साथीने लढलेल्या या युद्धातील अनुभवांचे कथन संजय कुमार यांनी केले. त्यानंतर ‘एनडीए’च्या वाटचालीचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. ‘एनडीए’तील प्रसिद्ध सुदान सभागृह, हबिबुल्लाह संग्रहालय, हॉर्स रायडींग आणि त्रिशक्ती शॉप येथे भेट देऊन पाहणी केली.
‘एनडीए’मधील शिक्षक मोहंमद हमीद अन्सारी यांनी शिस्त, प्रामाणिकता आणि शक्य त्या स्वरूपातील राष्ट्राची सेवा याविषयी मार्गदर्शन केले. सूर्यदत्त शिक्षण संस्था शालेय वयापासूनच मुलांमध्ये देशभक्ती, देशसेवा, प्रामाणिकपणा आणि संस्कार व मूल्यांची रुजवण करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सूर्यदत्त राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. भारतीय संस्कृती व मूल्ये याबाबत जनजागृती करण्याचे काम सूर्यदत्त शिक्षण संस्था करत आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “तरुण पिढीमध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेमभाव, राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची भावना रुजवण्यासाठी सूर्यदत्त सातत्याने प्रयत्न करते. संरक्षण क्षेत्रातील मान्यवर अशा ‘एनडीए’ संस्थेला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधणे ही सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. आपल्या भारतीय जवानांकडून शिस्त, समर्पण, देशप्रेम, प्रामाणिकपणा या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन व त्यांचा सहवास मिळणे, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
‘एनडीए’मधून जागतिक दर्जाचे संरक्षण दलाचे प्रशिक्षणार्थी घडत आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादातून परिवर्तनाला सुरुवात होते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. देशप्रेम जागृत होते. प्रत्येकाने भारतीय संस्कृती, मूल्ये समजून घेत आत्मसात करावेत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देऊन देशाच्या उभारणीत, विकसित भारताच्या उपक्रमात योगदान द्यावे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.