सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर

वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यास दौऱ्यावर
 

पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक यांचा एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला १८ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ९ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजिला आहे.  वैश्विक समरसता कार्यक्रमात एआयटीमध्ये चार दिवसांचा दौरा असून, येथे एआयटीमधील तज्ज्ञ प्राध्यापकांची अभ्यागत व्याख्याने, कॅम्पस सहल, नेटवर्किंग, रॉबर्ट बॉश, सियाम सिमेंट ग्रुप अशा उद्योगांना भेटी असतील. दोन दिवस पटाया येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर बुद्ध मंदिराचे दर्शन व फ्लोटिंग मार्केटला भेट होणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया दिली.

परस्पर शैक्षणिक सहकार्य आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने अलीकडेच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांची देवाणघेवाण, क्षमता संवर्धन आणि इतर परस्पर फायद्याच्या उपक्रमांना चालना देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. त्याअंतर्गत हा अभ्यास दौरा होत आहे. या वैश्विक समरसता कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकॉक या व्हायब्रँट शहरात शैक्षणिक समरसता, औद्योगिक अनुभव आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे एक अद्वितीय मिश्रण अनुभवता येणार आहे. यातून त्यांना एक सर्वसमावेशक, समृद्ध आणि परिवर्तनशील शैक्षणिक अनुभव मिळणार असून, सांस्कृतिक समरसता आणि करिअर वाढीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात शाश्वत करिअर घडविण्याची संधी देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. यातून विद्यार्थ्यांना जागतिक व्यवसायाच्या वेगाने बदलणाऱ्या क्षेत्रात प्रगतीसाठी आवश्यक कौशल्ये आणि अंतर्दृष्टी मिळेल, असा विश्वास असल्याचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. आशियातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या ‘एआयटी’ची स्थापना वाढत्या अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, संशोधन आणि क्षमता निर्मितीच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने १९५९ मध्ये झाली होती. जागतिक अर्थव्यवस्था व शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतील, असे योग्य व समर्पित भावनेने काम करणारे व्यावसायिक घडविण्याचे ध्येय घेऊन एआयटी आजवर कार्यरत आहे. व्यवसायाभिमुख, संशोधनात्मक आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतीमुळे एआयटीमध्ये शिकणाऱ्या पदवीधरांना आशिया आणि त्यापलीकडे व्यावसायिक यश आणि नेतृत्व प्राप्त होते.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण देणारी संस्था असून, शालेय शिक्षणापासून ते कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पर्यंतचे विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून दिले जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने आणि नामवंत विद्यापीठांशी संलग्नित बिझनेस मॅनेजमेंट, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, एज्युकेशन, अनिमेशन, विधी व न्याय, सायबर सिक्युरिटी, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, फिल्म मेकिंग, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस, परफॉर्मिंग आर्टस् आदी शाखांमध्ये अभ्यासक्रम शिकवले जातात.

ऑगस्ट २०२३ मध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी एआयटी कॅम्पसला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सूर्यदत्त आणि एआयटी यांच्यातील संभाव्य सहकार्य कराराबाबत तेथील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालक डॉ. सुमना श्रेष्ठा आणि विशेष पदवी कार्यक्रम संचालक व भूगणितशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नितीन कुमार यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर या दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक आदानप्रदानाविषयी सामंजस्य करार झाला. ‘सूर्यदत्त’च्या प्रमुख टीमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *