वीज तांत्रिक कामगारांना चांगली पगारवाढ देण्यासाठी प्रयत्नशील

वीज तांत्रिक कामगारांना चांगली पगारवाढ देण्यासाठी प्रयत्नशील

विश्वास पाठक यांचे आश्वासन; महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे : “वीज तांत्रिक कार्मगार हा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणारा हा घटक आहे. अहोरात्र मेहनत घेऊन राज्यातील तीन कोटी ग्राहकांना सेवा देणाऱ्या या कामगारांना चांगली पगारवाढ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे वीज तांत्रिक कामगारांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विश्वास पाठक बोलत होते. येरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते. प्रसंगी महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महानिर्मितीचे संचालक एस. एम. मारुडकर, महापारेषणचे संचालक सुगत गमरे, महावितरण कंपनीचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, भारत पाटील, महानिर्मितीचे मुख्य अधिकारी पी. एल. वारजूरकर, संयोजक हाजी सय्यद जहिरोद्दीन, स्वागताध्यक्ष बाळासाहेब सायकर व कार्यशाळा प्रमुख अपसरपाशा सय्यद आदी उपस्थित होते. राज्यभरातून ८०० पेक्षा अधिक वीज तांत्रिक कामगार कार्यशाळेत सहभागी झाले.
 
 
विश्वास पाठक म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०१८ मध्ये पाच वर्षांकरिता वीज तांत्रिक कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली होती. हे वर्ष पगारवाढीचे असून,  आताचे सरकार शिंदे-फडणवीस यांचे असून, ऊर्जामंत्री फडणवीसच आहेत. त्यामुळे पगारवाढीचा निर्णय लवकरच होईल. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आता वीजदेखील मूलभूत गरज बनली आहे. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही संस्थांतील आपण सर्वजण वीज पुरवतो. आज राज्याला २८ हजार मेगावॅट वीजनिर्मितीची गरज असून, त्यातील १० हजार मेगावॅट वीज आपण पुरवत आहोत. कामगार चळवळीची गरज आहेच; पण आपल्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.”
हाजी सय्यद जहिरोद्दीन म्हणाले, “कामगारांच्या सुरक्षेसाठी, हितासाठी तसेच संघटनेला सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. तांत्रिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चळवळ जिवंत ठेवणारी ही संघटना आहे. तिन्ही कंपन्यांशी संबंधित कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत. गाव तिथे वीज आणि वीज तिथे तांत्रिक कामगार आहे. त्यामुळे २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी कामगारांना चांगली पगारवाढ मिळायला हवी.”
 
 
भाऊसाहेब भाकरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. अरविंद भादीकर, एस. एम. मारुडकर, सुगत गमरे, अंकुश नाळे, राजेंद्र पवार, अनिल कोळप, भारत पाटील, पी. एल. वारजूरकर यांनीही मार्गदर्शन केले. कल्पक व आकर्षक विद्युत रोषणाई, डिजिटल स्वरूपात कमळाच्या पाकळ्या उलगडत केलेले दीप प्रज्वलन आणि रिमोटच्या सहाय्याने व्यासपीठावर झालेल्या पुष्पवृष्टीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *