आयुर्वेदाला नवकल्पना, संशोधन व जागतिक भागिदारीची जोड द्यावी
भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळा व आयुर्वेद संभाषा या विशेष कार्यक्रमात जिष्णू देव वर्मा बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात भारतीय आयुर्वेद संस्थेचे अध्यक्ष वैद्य प्रशांत दौंडकर, सचिव वैद्य संकेत खरपुडे आदी उपस्थित होते.
जिष्णू देव वर्मा यांनी मोजक्या शब्दांत आयुर्वेदाचे महत्त्व सांगितले. “आयुर्वेद मूळात स्वास्थ्यरक्षण कथन करणारा आहे. मात्र, काही कारणाने स्वास्थ्य बिघडले, तर ते पूर्वपदावर कसे आणायचे, यासाठीचे उपायही आयुर्वेद प्रभावीपणे सांगतो. मानवी शरीरासोबत मन, बुद्धी आणि आत्म्याचा विचार, हा घटक आयुर्वेदाला एकमेकाद्वितीय बनवितो. भारतीय आयुर्वेद संस्था विविध उपक्रमांतून आयुर्वेदाचे हे महत्त्व अधोरेखित करत आहे, हे उल्लेखनीय आहे. आयुर्वेदाचा प्रसार जागतिक पातळीवर होण्यासाठी सातत्यपूर्ण संशोधन, जागतिक भागीदारी आणि नवकल्पनामध्ये समतोल साधण्याची आवश्यकता आहे, तरच आपण निरामयतेकडे वाटचाल करू शकू”, असे ते म्हणाले.
पूर्वार्धात धन्वंतरी सन्मानप्राप्त आयुर्वेद तज्ज्ञांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, साधना आणि यशस्वी कहाणी जाणून घेण्याची संधी मिळाली. या अनुभवकथनांतून श्रोत्यांनी आयुर्वेदाचे सुवर्णक्षण अनुभवले. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञांच्या जीवनप्रवासाची ही प्रेरणादायी झलक ऐकताना श्रोते तल्लीन झाले. वैद्य जमदग्नी यांनी आयुर्वेद आणि फार्म्यूला, याविषयी, तर वैद्य सरदेशमुख यांनी कर्करोग संशोधनाविषयी विवेचन केले.
वैद्य प्रशांत दौंडकर यांनी प्रास्ताविक सांगितले की, भारतीय आयुर्वेद संस्था देशभरात आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्यासाठी, तसेच कॅशलेस मेडिक्लेम आणण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक मदत करत आहे. वैद्यांचे व आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांचे अधिकार याबाबतीत पाठपुरावा करणे, आयुर्वेद लोकाभिमुख करण्यासाठी शासकीय योजना आणणे व आयुर्वेदाचा सर्वांगीण प्रचार व प्रसार करण्याचे काम करते. डॉ. परवेझ बागवान आणि पूजा गुजरे यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य संकेत खरपुडे यांनी आभार मानले.