पुणे : ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणे व इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (इडस्सा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पालघरच्या सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात सेंट जॉनने नाशिकच्या केके वाघ संघाचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. येवलेवाडी येथील केजे शिक्षण संकुलाच्या क्रिकेट मैदानावर आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील एकूण १४ विभागातील डिप्लोमा कॉलेजच्या संघानी भाग घेतला होता.
नाणेफेक जिंकून नाशिकच्या केके वाघ संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित १० षटकांत ७ बाद ७९ धावा केल्या. प्रिन्स महाजनच्या ३७, अंकित अहेरच्या ९ धावा वगळता इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. प्रज्योत जाधवने १४ धावांत २ बळी मिळवले. स्मिथ तांडेल, धीरेन पटेल, भूमीत मोरे, अथर्व तामोरे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठी ८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सेंट जॉन संघाने सुरुवातीपासून केके वाघ संघाच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. मंथन सांख्येने नाबाद २७ आणि अथर्व तामोरेने नाबाद ३५ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. प्रिन्सने १ बळी घेतला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा ‘इडस्सा’चे अध्यक्ष डॉ. विठ्ठल बांदल, केजे संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, व्यवस्थापकीय संचालिका सौ. हर्षदा जाधव, ट्रिनिटी पॉलिटेक्निक पुणेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. संतोष डोईफोडे व पॉलिटेक्निकच्या सर्व टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्मिता जगताप यांनी केले.
डॉ. विठ्ठल बांदल म्हणाले, “सोशल मीडियाच्या जमान्यात मैदानी खेळ कमी झाले आहेत. परंतु, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने मैदानी खेळ आवश्यक असून, क्रिकेट हा खेळ औत्सुक्याचा व सांघिक प्रयत्न पणाला लावणारा असा आहे.”
संस्थेच्या संचालिका सौ. हर्षदा जाधव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दोन्ही संघांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व कामगिरीचा आलेख उंचावत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विजेत्या व उपविजेत्या संघास पारितोषके व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. अथर्व तामोरे सामनावीर ठरला, तर मालिकावीराचा किताब केके वाघ नाशिक संघाच्या सोहम शार्दुलने पटकवला.
संक्षिप्त धावफलक:
केके वाघ नाशिक – (१० षटकांत) ७ बाद ७९ (प्रिन्स महाजन ३७, अंकित आहेर ९, प्रज्योत जाधव २-१४) पराभूत विरुद्ध सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पालघर (९.३ षटकांत) १ बाद ८० (अथर्व तामोरे ३५, मंथन सांख्ये २७, प्रिन्स महाजन १-१०)