नागरी बँकांमध्ये नियामक अनुपालन व तांत्रिक अनुप्रयोग याविषयी राज्यस्तरीय बँकिंग परिषद

नागरी बँकांमध्ये नियामक अनुपालन व तांत्रिक अनुप्रयोग याविषयी राज्यस्तरीय बँकिंग परिषद

महाराष्ट्रातील ११२ हून अधिक बँकांच्या पदाधिका-यांचा सहभाग

पुणे : नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन म्हणजेच रेग्युलेटरी कम्प्लेयन्स आणि तांत्रिक अनुप्रयोग म्हणजेच आयटी चा उपयोग कशा प्रकारे व्हावा, त्याबाबत आव्हाने आणि संधी काय आहेत, याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) तर्फे बुधवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० यावेळेत राज्यस्तरीय बँकिंग परिषद पुणे रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे आयोजित करण्यात आली आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यातील ११२ हून अधिक बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संगणक विभाग प्रमुख व पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अ‍ॅड.साहेबराव टकले, संचालक निलेश ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ.अनिल कारंजकर, आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय परिषदेचे उद्धघाटन बुधवारी सकाळी ९ वाजता राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या हस्ते होणार आहे. उद्धघाटनप्रसंगी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, बाळासाहेब अनास्कर, अतुल खिरवाडकर, आमदार संजय जगताप, विजय ढेरे, रमेश वाणी, मिलिंद काळे, निलेश ढमढेरे, माजी आमदार नामदेव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिषदेत बँकिंग क्षेत्रात काम करणारे ३०० हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, परिषदेमध्ये नागरी सहकारी बँकांमध्ये नियामक अनुपालन – आव्हान व संधी, व्यय परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोग आणि परिणामकारक तांत्रिक अनुप्रयोगाच्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांचे नियामक अनुपालन आदी विषयांवर चर्चा व सुसंवाद होणार आहे. यामध्ये विद्याधर अनास्कर, जयंत काकतकर, अपेक्षिता ठिपसे, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप भोईर, अतुल खिरवाडकर, विक्रांत पोंक्षे, अ‍ॅड.राजेश पिंगळे आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

नागरी सहकारी बँकेतील निर्णयाचे अधिकारी असणा-या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये चर्चा व्हावी व सहकारात सहकार निर्माण होऊन नागरी सहकारी बँकांना बळ द्यावे, हा परिषदेचा उद्देश आहे. तसेच अधिकारी व कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात येणा-या अडचणींवर मार्गदर्शन करण्यासाठी असोसिएशन सदैव तत्पर असते. बँकांचे संचालक, सेवक उत्तमप्रकारे प्रशिक्षीत व्हावेत आणि सहकारी चळवळ सुदृढ व्हावी, हा असोसिएशनचा प्रयत्न असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *