तरुणांमध्ये रुजतेय स्टार्टअप संस्कृती

तरुणांमध्ये रुजतेय स्टार्टअप संस्कृती

बाबुराव चांदेरे यांचे मत; बाणेर येथील ‘किऑस्क काफी’ स्टार्टअपच्या सातव्या शाखेचे उद्घाटन

पुणे : कोरोनाच्या कठीण काळातही तरुण नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळताहेत. त्यांच्यामध्ये स्टार्टअप संस्कृती रुजतेय, याचे समाधान वाटते. तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करीत अतिशय छोट्या जागेतून उत्तम कॉफी देण्याची, तसेच वापरलेल्या कॉफी बीन्सची पावडर ग्राहकाला परत देत खत निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाची जोड देण्याची कल्पना ‘किऑस्क काफी’मधून राबवली जात आहे, हे कौतुकास्पद आहे,” असे मत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

संग्राम पाटील, निलेश पासलकर आणि सावन ओसवाल या तीन तरुणांनी एकत्र येत बाणेर येथे लाईफलाईन फार्मसीजवळ सुरु केलेल्या ‘किऑस्क काफी’ या सातव्या शाखेचे उद्घाटन चांदेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर चांदेरे, पूनम विधाते, विशाल विधाते, केदार खडके आदी उपस्थित होते. केवळ ३० स्क्वेअर फुटाच्या जागेत असलेल्या ‘किऑस्क काफी’ने अवघ्या दहा महिन्यात एक लाखापेक्षा अधिक कॉफीचे वितरण, ७० हजार समाधानी ग्राहक आणि ३०-३५ तरुणांना रोजगार दिला आहे. संग्राम पाटील यांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप सुरु केला आहे.

संग्राम पाटील म्हणाले, “कोरोना काळात नोकरीची अनिश्चितता लक्षात घेत स्टार्टअपचा विचार मनात होता. छोट्याशा जागेतून उच्चप्रतीची, वेगवेगळ्या प्रकारची कॉफी कशी देता येईल, यावर तीनचार महिने संशोधन केले. त्याला तंत्रज्ञानाची आणि पर्यावरण संवर्धनाची जोड दिली. थेट बीन्समधून कॉफी बनवून दिली जात असून, वापरलेली बीन्स पावडर ग्राहकाला परत दिल्या जातात. त्यातून खत निर्मिती होते. फर्ग्युसन रस्त्यानजीक छोट्याशा जागेत सुरु केलेली ‘किऑस्क काफी’ आज शहराच्या चारही बाजूला सेवा देत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *