जितो पुणे बी टू बी विभागातर्फे संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आजची सामाजिक व्यवस्था ही धार्मिक सिद्धांतानुसार घडली पाहिजे. समाजाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे. सर्वांचा आर्थिक-सामाजिक स्तर एक झाला पाहिजे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाली आहे; पण माणसाचे मन खुश आहे का याचाही विचार होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शुद्ध सामाजिक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाचे उत्थान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रिझर्व बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर पद्मभूषण डी. आर. मेहता यांनी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) पुणे विभागातर्फे आर्थिक सक्षमीकरणासंदर्भात दि. ६ नोव्हेंबर रोजी सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी, पुणे येथे संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पद्मभूषण डी. आर. मेहता म्हणाले, “भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्थिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात सकारात्मक बदल घडले आहेत. परंतु आजही भारतात नैतिकतेचा अभाव जाणवतो तसेच नियमांच्या अंमलबजाणी बाबतीत भारत पुरेसा शिस्तबद्ध नाही. बाजारातील परिस्थितीचा सर्वांगिण अभ्यास करून मगच व्यावसायिकाने गुंतवणूक करावी, जोखीम किती आणि कशी घ्यायची याचाही सारासार विचार होणे गरजेचे आहे.”
पुढे आर. डी. मेहता म्हणाले, “आपण समाजासाठी काय केले असा विचार केला असता फक्त प्रशंसा नको तर कामातून आनंद-समाधान मिळाले पाहिजे याची जाणिव झाली. एका जीवघेण्या अपघातातून बरे होत असताना धार्मिक-आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले त्यातूनच मनात समाजासाठी काही तरी केले पाहिजे गोर-गरिबांची सेवा घडली पाहिजे या विचारांनी उचल खाल्ली आणि करूणेच्या भावनेतून संस्था स्थापन केली. यातून आर्थिकदृष्ट्या निर्बल-अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसविण्याचे कार्य हातून घडले. प्राकृत भाषेचे संवर्धन झाले पाहिजे, विद्यार्थ्यांना भाषेची-अभ्यासाची गोडी लागली पाहिजे या हेतूने वाचनालय-अभ्यासिका यांची केलेली निर्मितीही मनाला आनंद-समाधान देते. जयपूर शहर पुण्यापेक्षा सुंदर असले तरी पुणे हे भारतातील एकमेव असे शहर आहे की जेथे सेवा संस्था, शिक्षण संस्था, विज्ञान संस्था आणि सांस्कृतिक संस्था यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो असे गौरवोद्गारही मेहता यांनी काढले. वय हा फक्त आकडा आहे, सातत्याने काम करत राहिलात तर शरीररूपी गाडी चांगली चालेल अन्यथा शरीराचा खटारा होईल असा मोलाचा सल्लाही 87 वर्षे वयाच्या मेहता यांनी यावेळी उपस्थितांना दिला. मेहता यांच्याशी अजिंक्य देशमुख यांनी संवाद साधला.”
मेहता यांचे स्वागत विजय भंडारी, इंदरजी जैन कांतिलाल ओसवाल, इंद्रकुमार छाजेड दिनेश ओसवाल लक्ष्मीकांत खाबिया चकोर गांधी दिलीप जैन रूपेश कोठारी जयेश फुलपगर, अमोल कुचेरिया,यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी धीरज छाजेड, सुजित भटेवरा, संगीता ललवाणी, गौरव बाठीया, शैलेश पगारिया, प्रकाश धोका, एकता भन्साळी, खुशाली चोरडिया इत्यादी उपस्थित होते. परिचय वनिता मेहता यांनी करून दिला. दिनेश ओसवाल याने स्वागत केले. आभार अमोल कुचेरिया यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले.