रिक्षा-कॅब चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; रिक्षांना हिरवा झेंडा दाखवत सेवेला सुरुवात

रिक्षा-कॅब चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती; रिक्षांना हिरवा झेंडा दाखवत सेवेला सुरुवात

                                                             

पुणे : मेट्रो प्रवाशांना शेवटच्या टप्प्यापर्यंत (Last Mile Connectivity) सुलभ व परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसएनडीटी मेट्रो स्थानक येथे “रिक्षमित्र मेट्रो शेअर रिक्षा फीडर सेवा” बूथचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रिक्षा व कॅब चालक उपस्थित होते.

या बूथचे उद्घाटन राज्याचे मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. महापौर मंजूषा नागपुरे, श्री. श्रावण हर्डीकर (व्यवस्थापकीय संचालक – महा मेट्रो) आणि श्री. अनिलकुमार कोकाटे (संचालक – एमएमआय विभाग, महा मेट्रो) उपस्थित होते. यावेळी कामगार नेते डॉ. केशव नाना क्षीरसागर तसेच परिसरातील आजी-माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने रिक्षा व कॅब चालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रिक्षांना हिरवा झेंडा दाखवून “रिक्षमित्र मेट्रो शेअर रिक्षा फीडर सेवा” औपचारिकपणे सुरू केली.

यावेळी बोलताना रिक्षाचालकांच्या सोयीसाठी बूथवर सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना सीएनजी कूपन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.कार्यक्रमात बोलताना मा. महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुणे शहरातील सर्व मेट्रो स्थानकांवर अशा प्रकारची मेट्रो फीडर रिक्षा सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः सिंहगड रोड परिसरातील प्रवाशांसाठीही अशी सुविधा उपलब्ध व्हावी, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश मेट्रो शेअर रिक्षा सेवेसाठी ड्रॉप लोकेशनमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानक येथे सुरू करण्यात आलेल्या “रिक्षमित्र” बूथला नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या उपक्रमाच्या यशस्वी अनुभवाच्या पार्श्वभूमीवर एसएनडीटी मेट्रो स्थानकावरही “रिक्षमित्र मेट्रो शेअर रिक्षा फीडर सेवा” सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना अधिक शिस्तबद्ध, विश्वासार्ह आणि सोयीस्कर रिक्षा सेवा उपलब्ध होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

ही सेवा सुरू झाल्यामुळे मेट्रो प्रवाशांना शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरक्षित, सुलभ आणि परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून रिक्षाचालकांना देखील नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.