पुणे, ता. ११ : पालकत्वाच्या जबाबदारीचे आव्हान पेलणाऱ्या एकट्या आई किंवा वडिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. संघर्षाच्या या प्रवासात अनेकांना आपलेपणाची साथ हवी असते. सकारात्मक अनुभव, प्रेरणा आणि आप्तेष्टांच्या साथीने एकल पालकत्व अधिक सुकर होण्यासाठी ‘एकल पालक दिन’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने येत्या २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, बीएमसीसी रस्ता, पुणे येथे एकल पालक संमेलनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सचे संचालक भूषण वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी कौटूंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी उपस्थित होत्या.
एकल पालक संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. एकट्याने पालकत्वाची जबाबदारी सांभाळत असलेल्या पालकांना एकत्रित करून त्यांचा हुरूप वाढवण्याचा प्रयत्न यातून होतो. तसेच त्यांना संघर्षाच्या वाटेवर आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी मिळते. ‘एकल पालक’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मनोरंजनाचे कार्यक्रम, तसेच आर्थिक नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते. यंदा मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे विशेष मार्गदर्शन सत्र असणार आहे. डॉ. स्मिता जोशी यांचे कौटुंबिक संबंधांवर, तर भूषण वाणी यांचे आर्थिक नियोजनावर व्याख्यान होणार आहे. लहान मुलांसाठी वेगळ्या जागेत मनोरंजात्मक उपक्रम असणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. मात्र, योग्य नियोजनासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
भूषण वाणी म्हणाले, “पालकत्व निभावणे आनंददायी असले, तरी ही जबाबदारी जेव्हा एकट्या आई किंवा वडिलांवर पडते, तेव्हा हे आव्हान कैक पटींनी वाढते, संघर्ष सुरू होतो. अशावेळी सक्षमपणे ही भूमिका निभावणाऱ्या पालकांचे कौतुक करण्यासह ही भूमिका निभावताना घ्यायची काळजी, करायचे नियोजन याविषयी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्रत्येक एकल पालक व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी भेटणे, बोलणे गरजेचे आहे. यातून आपली निर्णयक्षमता, पालकत्वाच्या कक्षा रुंदावतील.”
