डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार वितरण

सेवाकार्यातून समाजासाठी योगदान देणाऱ्या कृषी, पर्यटन, पर्यावरण, वैद्यकीय, पोलिस, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशन व अॅग्रो टुरिझम विश्व यांच्या वतीने सेवाकार्य कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, सचिव मनीषा उगले, राधेय सामाजिक संस्थेचे सूर्यकांत पोतुलवार, संयोजन समितीतील पवन घटकांबळे, सारंग मोकाटे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, यशदा येथील प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड, बायोस्पीयर्स संस्थेचे डॉ. सचिन पुणेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदासघेवारे, देहू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन घेरडे, चित्रपट दिग्दर्शक अक्षय इंडीकर, कृषी उद्योजक रितेश पोपळघट, कार्तिकेयन्स जनसेवा फाउंडेशनच्या ऍड. मोनिका गावडे यांना ‘सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी भारती प्रकाशनचे सिद्धेश्वर हाडबे, गुट्टे प्रकाशनच्या डॉ. आशालता गुट्टे व जी. के. प्रकाशनचे गणेश काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सगळ्या धर्मात चांगली-वाईट माणसे असतात. त्यातील चांगल्या विचारांच्या बेरजेतून आपण वाटचाल केली पाहिजे. अनेक राष्ट्रप्रमुखांच्या वागण्यातून आजही हिटलरशाही वृत्तीचा प्रत्यय येतो. याला छेद द्यायचा असेल, तर मानवतेची जाण असलेल्या समाजाची निर्मिती व्हायला हवी. सर्व धर्माचा अभ्यास करून त्यातील मानवी मूल्यांना आत्मसात करावे. भविष्यातील जैविक हत्यारांचा धोका ओळखून विधायक संशोधन करण्यावर भर द्यायला हवा. युवाशक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी बुद्ध, महावीर, गांधी या त्रिकुटाचे विचार महत्वाचे आहेत. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सर्वानी पर्यावरण संवर्धन, जनसामान्यांचे कल्याण यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत.”

प्रास्ताविकात गणेश चप्पलवार म्हणाले, “माझे आजोबा परभन्ना चप्पलवार यांनी केलेले सेवाकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे करतानाच समाजात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा कृतज्ञता सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्याकडून चांगले शिकण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.” अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पोतुलवार यांनी आभार मानले.
