‘ग्रीन सोल्युशन्स’तर्फे खरमाळे दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे, दि. २५ – “पर्यावरण संवर्धन हे आता केवळ सामाजिक कार्य राहिले नाही, तर या क्षेत्रात उद्योग, व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, पर्यावरणीय सल्लागार सेवा, हरित बांधकाम, जलसंवर्धन प्रणाली, इलेक्ट्रिक वाहने व त्यांची चार्जिंग स्टेशन्स अशा विविध संधी खुणावत आहेत,” असे मत प्रसिद्ध लेखक व उद्योजक शरद तांदळे (sharad tandale) यांनी व्यक्त केले.
ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त ( On the occasion of the 13th anniversary of Green Solutions Institute ) आयोजित कार्यक्रमात शरद तांदळे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी सैनिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे या दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे, ‘ग्रीन सोल्यूशन्स’चे संस्थापक सागर अहिवळे (sagar ahiwale ) व आरती भोसले-अहिवळे, ‘सीओईपी’चे सहअधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश राऊत (dr. Prakash rauth )आदी उपस्थित होते.
शरद तांदळे म्हणाले, “वाढते पर्यावरणीय प्रश्न, हवामान बदलाचे संकट आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने होणारी घट यामुळे संपूर्ण जग पर्यावरणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहू लागले आहे. पारंपरिक व्यवसायांप्रमाणेच हरित व्यवसाय एक व्यवहार्य आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. योग्य योजना, तंत्रज्ञान आणि उद्योजकीय दृष्टिकोनासह काम करत तरुणांनी इनोव्हेशन, स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग सुरु (Starting an industry through startups) करावेत.”
रमेश खरमाळे म्हणाले, “प्लास्टिकचा अनिर्बंध वापर रोखणे ही आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षण ही देशसेवाच आहे, असे मला वाटते. शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्लास्टिकचा प्रश्न गंभीर असून, त्यातून विषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत आहे. प्रदूषण, कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापमानवाढीचे संकट गंभीर होत आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरण वाचवण्यात योगदान द्यावे.”
डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन सोल्यूशन्स करीत असलेल्या कार्याचा गौरव केला. डॉ. प्रकाश राऊत यांनी आपल्या विद्यार्थ्याने पर्यावरण क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. आरती भोसले-अहिवळे यांनी प्रास्ताविक केले. सागर अहिवळे यांनी आगामी योजनांविषयी अवगत केले. यशोधन रामटेके, डॉ. गणेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले.