ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार विलास चाफेकर यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार विलास चाफेकर यांचे निधन

पुणे : वंचित विकास, जाणीव संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे विचारवंत विलास चाफेकर सर यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या रविवारी (२५ जुलै) सकाळी १० ते १२ या वेळेत वंचित विकासच्या नारायण पेठेतील कार्यालयात चाफेकर सरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

जाणीव संघटना, वंचित विकास या संस्थांच्या माध्यमातून चाफेकर सरांनी वेश्या वस्तीतील मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्‍यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीनदुबळ्यांसाठी आपले जीवन वेचले. समाजाने नाकारलेल्या निरागस व अस्तित्वहीन जीवांसाठी त्यांनी ‘नीहार’ उभारले. त्यातून उभे राहिलेले प्रगतीशील युवक आज मोठ्या संस्थांत काम करत आहेत. मानवी मूल्यांशी कधीही तडजोड न करता आणि आलेल्या संकटांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याच्यावर त्यांचा अधिक भर होता. सखोल अभ्यास, सुस्पष्ट विचार, परखड मत मांडण्याचा त्यांचा शिरस्ता होता. ‘मी, माझं, माझ्यामुळं, माझ्यासाठी’ या शब्दांच्या पलीकडे निस्वार्थी कार्य करणारे चाफेकर सर होते.

ठाणेवासी मुंबईकर असलेल्या चाफेकर सरांनी मुंबई विद्यापीठात सुवर्णपदकासह एमएची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. १९८२ ला जाणीव संघटना आणि १९८५ ला वंचित विकास संस्थेची स्थापना करुन सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली. वैयक्तिक प्रपंच न मांडता समाजाची, भवतालातील वंचिताची काळजी वाहणे हीच धारणा ठेवत स्वत:ला उत्तम माणूस, कार्यकर्ता आणि शिक्षक म्हणून घडविले. त्यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळे जनमानसातून त्यांना ‘सर’ ही पदवी बहाल झाली.

कोणत्याही वैयक्तिक अभिलाषेशिवाय त्यांनी उभारलेल्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. वंचित विकास, जाणीव संघटनेच्या नीहार, फुलवा, चंडिकादेवी आदिवासी मुलींचे वसतिगृह, लातूरमधील सबला महिला केंद्र, मानवनिर्माण, गोसावी वस्ती येथील प्रकल्प, जाणीव युवा अशा अनेक संस्थांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. खर्‍या अर्थाने तेच एक संस्था होते. त्यांच्या द्रष्टेपणामुळेच संस्थेचे कार्य महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही सुरु आहे. या कार्यात साथ देणाऱ्या देणगीदारांशी त्यांचा नियमित संपर्क होता.

सामाजिक कामाबरोबरच चाफेकर सरांनी आपल्यातला कलाकार, खेळाडू, शिक्षक, पत्रकार, नाटककारही जपला. शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटना, ग्रामीण शेतमजुर, मुंबईतील वेश्यावस्ती, धारावी झोपड़पट्टी, आणीबाणीचा लढा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ एज्युकेशनच्या प्रकल्पातून त्यांनी काम केले होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवलेले चाफेकर सर सुराज्य प्राप्तीसाठी यथोचित प्रयत्न करत होते. समाजातील तळाच्या, शेवटच्या माणसापर्यंत सुखसमाधान पोहोचावे, यासाठी अखेरपर्यंत कार्यरत राहिले.

—-

विपुल लेखन, प्रबोधनाचे काम

शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, प्रिंटिंग प्रेस चालक म्हणून १६ वर्षे नोकरी व्यवसायात घालवलेल्या चाफेकर सरांनी वृत्तपत्रे, नियतकालिके यातून वैचारिक व ललित लेखन करत प्रबोधनाचे काम केले. अनेक पुस्तकांचेही लेखन केले. त्यामध्ये पंचायत राज व स्वयंसेवी संस्था, रचनात्मक कार्याच्या दिशा, ६ डिसेंबरचे मूळ, नीहार, त्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासासाठी ही त्यांची पुस्तके, तर महाराष्ट्र नाट्य विद्यालयात प्रभाकर गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या चाफेकर सरांनी सामाजिक विषयावर तीन नाटकेही लिहिली. ज्याचे मुंबईत प्रयोग झाले.

दृष्टीक्षेपात समाजकार्य

– वयाच्या १७ व्या वर्षापासून सामाजिक कामात सहभाग

– १९५९ -१९६३ विद्यार्थी संघटनांमधून काम

– १९६२-६४ नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतमजूर व धनगर यांच्यात जागृतीचे काम

– १९६५-६६ घाटकोपर, मुंबई येथील वेश्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचे काम. रस्त्यावरची शाळा, मुलांची शब्दावली वेगळी असल्याने त्यानुसार अभ्यासक्रम तयार करुन अनौपचारिक शिक्षण दिले

– १९६७-७१ धारावी झोपडपट्टीतील २५ मुलांना घेऊन काम. अँटॅची बॅग तयार करण्याचे शिक्षण व फूटपाथवर बसून विक्री. ही सर्व मुले पदवीधर झाली असून, त्यांची स्वतंत्र बॅगांची दुकाने आहेत

– १९७२-७५ पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये काम शिक्षण, सामाजिक जागृती अत्यावश्यक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न हे कामाचे स्वरूप

– १९७५-७६ आणीबाणी विरुध्दच्या लढ्यात सहभाग

– १९७७-८० इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे तर्फे झोपडपट्ट्यात अनौपचारिक शिक्षणाचा प्रयोग, प्रकल्प प्रमुख म्हणून काम 

– १९७८-८० इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे तर्फे स्टेट रिसोर्स सेंटरचा संयोजक म्हणून प्रौढ शिक्षण क्षेत्रात काम

– १९८१-८४ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सामाजिक जाणीव प्रकल्पांचे प्रमुख म्हणून काम.

– १९८२ साली समाजातील वंचितांच्या विकासासाठी जाणीव संघटनेची स्थापना

– १९८४ पासून कायमची नोकरी सोडून सामाजिक काम

– १९८६ साली वंचित विकास या संस्थेची व ट्रस्टची स्थापना

– २०२० पर्यंत जाणीव संघटना, वंचित विकासाच्या माध्यमातून कार्यरत

 

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये हृदयमित्र प्रतिष्ठान (पुणे), ‘लक्ष्मी मोरेश्वर पुरस्कार’ (सातारा), नानासाहेब दांडेकर सार्वजनिक धर्मादाय न्यास यांच्यातर्फे निरलस, स्वार्थत्यागी आणि सेवाभावी जीवनातून सातत्याने समाजाची जडणघडण केल्याबद्दल ‘समाजशिल्पी’ पुरस्कार (मुंबई), मंथन प्रतिष्ठान (पुणे), पिंपरी-चिंचवड नगरपालिकेतर्फे ‘समाजभूषण’ पुरस्कार (पिंपरी-चिंचवड), शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टतर्फे कै. चिमणलाल गोविंददास सेवा पुरस्कार (पुणे), सार्वजनिक काका पुरस्कार, लोकमान्य सेवा संघ पालें, मुंबई तर्फे ‘समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, नानासाहेब मगर सोशल स्पोर्टस ट्रस्ट तर्फे ‘समाजभूषण’ पुरस्कार आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *