मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत यांचा त्वरित राजीनामा घ्या

मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत यांचा त्वरित राजीनामा घ्या

रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ड्रग्ज माफिया ललित पाटीलवरून काँग्रेस आक्रमक

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांच्या तावडीतून एखादा कुख्यात आरोपी सहज पळून जाणे, ही बाब पुणे पोलिसांसाठी लाजिरवाणी आहे. या गंभीर आणि संशयास्पद प्रकरणात आरोपी ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयातील सहा डॉक्टरांची, पोलिसांची, ससून अधिष्ठाता आणि संबंधित स्टाफची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. तसेच संशयाच्या भोवऱ्यात आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि अकार्यक्षम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात बोलताना सुरवसे-पाटील म्हणाले, ललित पाटील याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करून घ्या, असा फोन दादा भुसेंनी अधिष्ठाता यांना केल्याचे समोर आले आहे. ससूनसारख्या मोठ्या रुग्णालयात कुख्यात आरोपीवर नऊ महिने नेमके कसले उपचार केले जात होते? उपचाराच्या नावाखाली रुग्णालयातून ललित पाटील याचा पाहुणचार होत होता आणि ससूनमधूनच कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी सुरु होती. या तस्करीतील पैसा सरकारमधील मंत्री, ससून प्रशासन आणि पोलिसांना देखील जात असल्याचा संशय आम्हाला आहे.

आरोपीस पोलीस आणि रुग्णालय प्रशासनातील काही जणांचे निश्चितपणे सहकार्य होत होते. आरोपीस पळून जाण्यामध्ये देखील ह्याच लोकांनी मदत केली असून शिंदे-फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा आरोपीवर आशीर्वाद आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ससूनमधील डॉक्टर, पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री दादा भुसे यांचे सीडीआर तपासले जावेत. त्यातून अधिकची माहिती तपास यंत्रणाच्या हाती लागू शकते. या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दादा भुसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *