पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने दिला जाणारा दुसरा ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार्ड’ भारतीय जैन संघटना आणि शांतीलाल मुथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना जाहीर झाला आहे. १५२ व्या गांधी जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्कराचे स्वरूप विशेष मानचिन्ह, सन्मानपत्र, स्कार्फ असे आहे. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठान येथे लवकरच हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
गांधीजींचे विचार आचरणात आणून प्रत्येक कृती करणाऱ्या तपस्वीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. शांतीलाल मुथा यांनी भारतीय जैन संघटना व शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव असे मानव सेवेचे कार्य उभारले आहे. भूकंपग्रस्तांना मदत, कोरोना काळात त्यांच्या माध्यमातून झालेले कार्य दुःखितांचे जीवन सुखकर करण्यासाठी मोलाचे ठरले. यासह गरजू मुलांना मोफत शिक्षण, वैद्यकीय आणि ऍम्ब्युलन्स सुविधा अशा विविध समाजोपयोगी उपक्रमातील त्यांच्या मौलिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना यंदाचा दुसरा ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार् ड’ जाहीर करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “गांधी विचारांना आदर्श मानत गेली दोन दशके ‘सूर्यदत्ता’ कार्यरत आहे. विद्यार्थी-शिक्षकांमध्ये गांधीविचार रुजावेत, यासाठी यंदा १५२ व्या गांधी जयंतीनिमित्त गांधी सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध विभागांतर्गत स्पर्धा आणि उपक्रम आयोजिले जाणार आहेत. या सप्ताहात शांतीलाल मुथा यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यापूर्वी गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांनी खास खादीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे प्रदर्शन भरवले होते. खादी संकल्पनेवर फॅशन शो देखील झाला होता. गांधी विचारांतून आणखी प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच हे विचार जगणाऱ्यांचा सन्मान करावा या उद्देशाने १५१ व्या जयंतीनिमित्त ‘सूर्यदत्ता ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशन’ची स्थापना केली. फाउंडेशनमार्फत दिला गेलेला पहिला ‘गांधीयन फिलॉसॉफी अवार् ड’ ज्येष्ठ गांधीवादी नेते, विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांना गेल्या वर्षी प्रदान करण्यात आला होता.”