विविध वैज्ञानिक संस्थांच्या वतीने आयोजित ‘कट्टा मॉडेल’ कार्यक्रमात शास्त्रज्ञ, विज्ञानप्रेमींनी व्यक्त केला विश्वास
पुणे : विज्ञान-तंत्रज्ञानातील अनेक रहस्य उलगडण्याकरिता, नवसंशोधन, नवकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयोगशील राहावे लागते. दरम्यान अपयशाची भीती आपल्याला सतावत असते. अशावेळी अपयशाची भीती (फीअर ऑफ फेल्युअर) घालवण्यासाठी ‘सायन्स कट्टा’ ही कल्पना अतिशय उपयुक्त ठरते. कट्ट्यावरील चर्चेतून एखाद्या जटिल विषयासंदर्भात अनेक वाटा सापडतात आणि संशोधनाचा थांबलेला प्रवास नव्या दिशेने सुरु होतो. त्यातून आंतरशाखीय संशोधनाला चालना मिळते, असा विश्वास शास्त्रज्ञ व उपस्थित विज्ञानप्रेमींनी व्यक्त केला.
शिक्षण व संशोधनाच्या नव्या वाटा उलगडणाऱ्या ‘मॉडेल कट्टा’ या चर्चासत्राचे स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात आयोजन केले होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, स. प. महाविद्यालय, जीविधा पुणे, ज्ञानप्रबोधिनी आणि राजहंस प्रकाशन या संस्थांच्या वतीने आयोजित कट्ट्यावर जीवशास्त्राचे संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांच्या ‘कट्टा मॉडेल’ पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा रंगल्या.
पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मंदार दातार, बंगळुरू येथीलराष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रातील (एनसीबीएस) डॉ. कृष्णमेघ कुंटे, कॅनबायोसिसच्या संचालिका संदीपा कानिटकर, डॉ. मिलिंद वाटवे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्सचे माजी संचालक यशवंत घारपुरे यांनी विचार मांडले. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी समारोपाचे भाषण केले. प्रसंगी राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. राजेंद्रकुमार सराफ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सचे डॉ. सुयोग तराळकर, जीविधांचे राजीव पंडित आदी उपस्थित होते.

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, “पारंपरिक शिक्षणापेक्षा ज्ञान व आकलन अधिक महत्वाचे असते. ग्रामीण भागातील अनेक मुलांमध्ये ज्ञान आहे. त्यांना चालना देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी पिंपळाचे पार असत. त्यावर गावगप्पा होत. त्यातून अनेक नवीन माहिती मिळत असे. माहिती संकलनाचा कट्टा किंवा पार हा एक स्रोत आहे. विज्ञानातील प्रगतीसाठी असे कट्टे उपयुक्त ठरतील. मलादेखील अभ्यास, संशोधन करताना अशा स्वरूपाच्या पारांचा, कट्ट्याचा खूप उपयोग झालेला आहे.”
डॉ. कृष्णमेघ कुंटे म्हणाले, “चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची वृत्ती जोपासायला हवी. त्यासाठी मोकळ्या वातावरणात केलेला संवाद अधिक समृद्ध असतो. ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, त्यासाठी प्रत्यक्ष तिथे जाऊन केला पाहिजे. प्रयोगशाळेत बसून सगळ्या गोष्टी होत नाहीत. नव्या कल्पना, भवताली चालू असलेल्या घडामोडींविषयी कळण्यासाठी परस्परांतील संवाद महत्वाचा ठरतो. फुलपाखरांचा अभ्यास करण्यातही खूप हिंडलो आहे. येणाऱ्या संशोधकांनाही मला तेच सांगावेसे वाटते की, प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन काम करा.”
संदीपा कानिटकर म्हणाल्या, “आंतरशाखीय अभ्यासाचा, संशोधनाचा आपल्याकडे अभाव आहे. अधिक चांगल्या पद्धतीने संशोधन व्हायचे असेल, तर आपल्याला त्या विषयाचे विविध अंगाने अनेक कंगोरे समजून घ्यायला हवेत. हे करताना असे कट्टे, ग्रुप उपयोगी पडतात. चार लोक जमले की, त्यांच्या चार कल्पना पुढे येतात. त्यातून वैविध्यपूर्ण आणि महत्वाचे काम उभे राहू शकते. त्यातून उत्पादकता वाढण्यास मदत होते. क्षमता विकसन कार्यक्रमातून व्यवस्थेबद्दल असलेली भेटी काढण्याचे काम केले जाते.”
डॉ. मंदार दातार म्हणाले, “विज्ञान हे प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचे ज्ञान आहे. एकमेकांच्या संवादातून वेगवेगळे विषय शिकता येतात. आपण करत असलेल्या कामात अधिक रुची निर्माण होते आणि परिपक्वता येते. गणित, सांख्यिकी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विविध विभागाच्या लोकांनी एकत्रित काम केले, तर चांगले संशोधन निर्माण होईल. जैवविविधतेचा अभ्यास करताना प्रत्यक्ष निसर्गात जाऊन, त्याचे निरीक्षण, माहिती संकलन आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी एकमेकांशी चर्चा उपयोगी ठरते.”
यशवंत घारपुरे यांनी पुण्यात अनेक विज्ञान संशोधन संस्था असून, त्यांच्यातील परस्पर संवादातून, सहकार्यातून खूप काही घडू शकते, असे नमूद केले. डॉ. सदानंद बोरसे, प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. मिलिंद वाटवे व डॉ. सुयोग तराळकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. ‘आयसर’मधील संशोधिका डॉ. मनवा दिवेकर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजीव पंडित यांनी आभार मानले.