‘सारथी’चा मराठवाडा मित्रमंडळाच्या ‘एफएमसीआयआयआय’शी नवउद्योजकांना प्रशिक्षण व इन्क्युबेशनसाठी सामंजस्य करार

‘सारथी’चा मराठवाडा मित्रमंडळाच्या ‘एफएमसीआयआयआय’शी नवउद्योजकांना प्रशिक्षण व इन्क्युबेशनसाठी सामंजस्य करार

‘सारथी’चा मराठवाडा मित्रमंडळाच्या ‘एफएमसीआयआयआय’शी

नवउद्योजकांना प्रशिक्षण व इन्क्युबेशनसाठी सामंजस्य करार

पुणे, ता. ३: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेंशन अँड इन्क्युबेशन (एफएमसीआयआयआय) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला असून, मराठा-कुणबी समाजातील नवउद्योजकांना प्रशिक्षण व त्यांच्या स्टार्टअपला विकसित करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे. 

‘एफएमसीआयआयआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर तलाठी व ‘सारथी’ पुणेचे उपव्यस्थापकीय संचालक अनिल पवार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ‘एफएमसीआयआयआय’चे व्यवस्थापक प्रदीप पाटील, ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प संचालक (सांख्यिकी) भीष्म बिरादार, संशोधन अधिकारी अमर पाटील, मनीषा अहिरराव आदी उपस्थित होते.

डॉ. चंद्रशेखर तलाठी म्हणाले, “मराठवाडा मित्रमंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात असलेले ‘एफएमसीआयआयआय’ हे इन्क्युबेशन सेंटर २०१८ पासून टाटा टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या सहकार्याने शाश्वत, विस्तारक्षम व परिवर्तनशील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने नवउद्योजकांसाठी कार्यरत असून, आजवर ६५ पेक्षा अधिक स्टार्टअप्स इथे विकसित झाले आहेत. यातील आठ ते दहा उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायामार्फत अनेकांना रोजगार दिला आहे. भारताच्या नवउद्योजकता व रोजगारनिर्मिती या धोरणाला अनुसरून आम्ही काम करत आहोत.”

अनिल पवार म्हणाले, “मराठा-कुणबी समाजातील होतकरू व स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण व एक वर्षाकरीता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज असलेले हे केंद्र स्टार्टअपच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. येथे विविध प्रयोगशाळा, सुसज्ज कार्यालय, संगणक कक्ष, मिटिंग व बोर्ड रूम, थ्रीडी प्रिंटर व स्कॅनर, रोबोट, वर्किंग मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्टार्टअप प्रदर्शन, उद्योग भेटी, प्रशिक्षण व तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व गोष्टींचा उद्योजक बनू पाहणाऱ्या तरुणांना लाभ होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *